टीम इंडिया करणार पाकिस्तानचा हिशेब चुकता! हिंदुस्थानला विश्वचषकातील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या पराभवाचे उट्टे काढण्याची आणि परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करण्याची संधी टीम इंडियाला यंदा 28 ऑगस्टला मिळणार आहे. श्रीलंकेत येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. गतविजेता म्हणून हिंदुस्थानी संघाला या स्पर्धेच्या जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. सातवेळा आशिया चषक जिंकणाऱया टीम इंडियापुढे आता जबर आव्हान असेल ते पाकिस्तानी संघाचे. कारण पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि त्याचे वेगवान गोलंदाज हिंदुस्थानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत.

यंदा 21 ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातील लढत हायव्होल्टेज ठरणार यात शंका नाहीय. या स्पर्धेत टीम इंडियाची पाकिस्तानशी गाठ 28 ऑगस्टला पडणार आहे. या स्पर्धेत गतविजेता म्हणून टीम इंडियाला थेट प्रवेश मिळाला आहे. अन्य काही संघांना पात्रतापूर्व लढती खेळ्व्या लागणार आहेत. 21 ऑगस्टपासून खेळलेल्या जाणाऱया पात्रतापूर्व लढतींत यूएई, ओमान, नेपाळ, हाँगकाँग हे संघ खेळणार आहेत. तर प्रमुख स्पर्धेत हिंदुस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांना स्थान मिळाले आहे. यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2018 मध्ये संयुक्त अरब आमिरातीत (यूएई) खेळवली गेली होती. यंदा श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.

आशिया चषकातील उभय संघांची कामगिरी

हिंदुस्थान

वर्ष       स्थळ       कामगिरी
1984   यूएई        विजेतेपद
1988   बांगलादेश  विजेतेपद
1990   हिंदुस्थान   विजेतेपद
1995   यूएई       विजेतेपद
1997  श्रीलंका    उपविजेतेपद
2004  श्रीलंका    उपविजेतेपद
2008  पाकिस्तान  उपविजेतेपद
2010  श्रीलंका     विजेतेपद
2016  बांगलादेश   विजेतेपद
2018  यूएई       विजेतेपद

पाकिस्तान

1986  श्रीलंका उपविजेतेपद
2000  बांगलादेश विजेतेपद
2012  बांगलादेश विजेतेपद
2014  बांगलादेश उपविजेतेपद

आशिया चषकात टीम इंडियाच फॉर्मात

आतापर्यंत 14 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा खेळवल्या गेल्या. त्यात हिंदुस्थानचा चॅम्पियन्स म्हणून रेकॉर्ड अफलातून आहे. सुमारे सात वेळा हिंदुस्थानने ही स्पर्धा जिंकली असून पाकिस्तानला केवळ दोनदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले आहे.