
हिंदुस्थानच्या सेलिंगपटूंनी (शिडाच्या बोटी चालवणारे नौकानयनपटू) गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. नेत्रा पुमानन, विष्णू सरवनन, के. सी. गणपती व वरुण ठक्कर या चौघांनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करताना देदीप्यमान कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये चार सेलिंगपटू सहभागी होण्याची ही हिंदुस्थानची पहिलीच खेप ठरली हे विशेष.
विष्णू सरवननने गुरुवारी आशियाई क्वालिफायरमध्ये दुसरे स्थान मिळवित टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. त्याआधी बुधवारी हिंदुस्थानची आघाडीची महिला नौकायनपटू नेत्रा कुमानन हिने मुसाना ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी करीत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
पहिलीच हिंदुस्थानी महिला
त्याआधी महिला नौकानयनपटू नेत्रा पुमानन हिने मुसाना ओपन चॅम्पियनशिपमध्ये लेसर रेडियल इव्हेंटमध्ये हिंदुस्थानला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच हिंदुस्थानी महिला नौकानयनपटू ठरल्याने तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. 22 वर्षीय कुमानन हिने 21 गुणांची मोठी आघाडी मिळवित ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. नेत्रा पुमानन हिने रेस-9 आणि रेस-10 मध्ये अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले. कुमानन हिची हाँगकाँगची प्रतिस्पर्धी स्टेफनी नोर्टन 41 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.




























































