क्रिकेट नेक्स्ट – साई एमजे स्पोर्ट्स जेतेपदासाठी भिडणार

क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी आणि साई एमजे स्पोर्ट्स अॅकॅडमी या संघांनी तिसऱया ‘स्पोर्ट्सफिल्ड करंडक’ 12 वर्षांखालील 25-25 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला.

शाहु महाविद्यालय येथील सनराईज क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत कृष्णा भुरटूकणेने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर साई एमजे स्पोर्ट्स अॅकॅडमीने गॅरी कस्टर्न क्रिकेटअॅकॅडमीचा 9 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना साई एमजे स्पोर्ट्स अॅकॅडमीने 145 धावा धावफलकावर लावल्या. ऋषीकेश देशपांडेने नाबाद 47 धावांची, तर शुभम पानसे याने 27 धावांची खेळी केली. या आव्हानासमोर गॅरी कस्टर्न क्रिकेट अॅकॅडमीचा डाव 136 धावांवर मर्यादित राहीला. विश्वजीत मोझे (30 धावा) आणि आर्यश सिंग (24 धावा) यांनी प्रतिकार करून संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. कृष्णा भुरटूकणेने 3 गडी बाद केले.श्रीतेज काळेने केलेल्या अचूक गोलंदाजीच्यामुळे क्रिकेट नेक्स्टअॅकॅडमीने सनराईज क्रिकेट स्कूलचा 9 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनराईज क्रिकेट स्कूल संघाला 25 षटकांत केवळ 87 धावा जमविता आल्या. उत्कर्ष भोसलेने नाबाद 50 धावांची खेळी केली.