वेब न्यूज – पोपटांचा प्रवास पडला महागात

>> स्पायडरमॅन

प्रवासामध्ये आपल्याला अनेक चित्रविचित्र अनुभव येत असतात. मात्र काही काही अनुभव अत्यंत रंजक आणि अविस्मरणीय असतात. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बंगळुरूहून मैसूरला जाणाऱया बसमधल्या प्रवाशांना अशीच एक रंजक घटना अनुभवायला मिळाली. अनेकांनी त्याचे पह्टो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. या बसमध्ये प्रवास करण्यासाठी एक आजी आपल्या नातीसह बसमध्ये चढल्या. सध्या कर्नाटक सरकार महिलांसाठी उपयोगी काही योजना राबवीत आहे. त्यातली एक ‘शक्ती’ योजना होय. या योजनेंतर्गत महिलांना बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मंगळवारी अशाच योजनेंतर्गत प्रवास करण्यासाठी एक महिला आपल्या नातीसह बसमध्ये चढली. ‘शक्ती’ योजनेचा लाभ मिळत असल्याने तिने दोघींचेही तिकीट काढले नाही, पण गंमत अशी की, ही महिला नातीसोबत एका पिंजऱयात चार पोपटदेखील घेऊन आलेली होती. पंडक्टर साहेबांनी ही गोष्ट हेरली. ‘शक्ती’ योजनेत महिलांना प्रवास मोफत आहे, पण पोपटांचे काय? त्यांना काही ही योजना लागू नाही. पंडक्टर साहेबांनी तातडीने 444 रुपयांचे तिकीट महिलेच्या हातावर टेकवले. ते तिकीट पाहून महिला एकदम हडबडून गेली. एका पोपटाचे 111 असे 444 रुपयांचे भाडे तिला लावण्यात आले होते. ही मजेशीर घटना पाहून सहप्रवासीदेखील थक्क झाले, पण कायद्याचा विचार करता पंडक्टरने योग्य तीच कृती केली होती. KSRTC च्या नियमानुसार फक्त नॉनएसी बसमध्ये पाळीव प्राण्यांना प्रवासाची परवानगी आहे. विशेष सेवा देणाऱया बसेसना मात्र हा नियम लागू नाही. सध्या या पोपटांचा आणि त्यांच्या तिकिटाचा फोटो चांगलाच लोकप्रिय झाला आहे.