
श्रीलंकेतील जनतेच्या असंतोषाचा स्फोट झालाय. प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या या देशातील जनतेने उठाव करत राष्ट्रपती भवनावर हल्लाबोल केला. राष्ट्रपती भवनाला जनता घेराव घालणार असल्याचं कळताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढल्याचं कळतंय. यापूर्वी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याही घरावर जनतेने मोर्चा काढला होता. या मोर्चापूर्वी महिंदा राजपक्षे आपल्या संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. राष्ट्रपतींविरूद्ध आंदोलन पुकारणाऱ्यांनी श्रीलंकेतील खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावर हल्ला केला.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात 100 जण जखमी झाले आहेत. देशातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे. एसएलपीपीच्या 16 खासदारांनी पत्र लिहून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी तातडीने राजीनामा द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान राजपक्षे कुटुंबासह पळून गेले आहेत. आंदोलकांनी त्यांचे निवासस्थान ताब्यात घेतले आहे.
लोकसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत, राषट्रपती आणि पंतप्रधानांनी तत्काळ पद सोडावे. तसेच 30 दिवसांसाठी काळजीवाहून राष्ट्रपती नेमण्यात यावे. तसेच काही काळासाठी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यात यावे आणि देशात लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्या, असे ठरल्याने एका खासदाराने सांगितले. या बैठकीनंतर पंतप्रधान रानील विक्रमसिंघे राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले.





























































