श्रीलंकेचा मालिका विजय, बांगलादेशचा दुसऱ्या कसोटीत धुव्वा

श्रीलंकेने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा 209 धावांनी धुव्वा उडवून दोन सामन्यांची मालिका 1-0 फरकाने जिंकली. कर्णधार दिमुथ करुणारत्नेची दोन्ही डावांतील झुंजार फलंदाजी… लाहिरु थिरुमानेची पहिल्या डावातील 140 धावांची मॅरेथॉन खेळी आणि डावखुरा फिरकीपटू प्रवीण जयविक्रमने दोन्ही डावांत (11 बळी) केलेली अफलातून गोलंदाजी ही श्रीलंकेच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. पदार्पणवीर प्रवीण जयविक्रम या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळ दिमुथ करुणारत्नेच्या गळय़ात पडली.

श्रीलंकेने 7 बाद 493 धावसंख्येवर डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशला 251 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 242 धावांची मोठी आघाडी घेत अर्धी लढाई आधीच जिंकली होती. त्यानंतर श्रीलंकेने 9 बाद 194 धावांवर आपला दुसरा डाव घोषित करून बांगलादेशला विजयासाठी 437 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 71 षटकांत 227 धावांवरच संपुष्टात आला आणि श्रीलंकेने रुबाबदार विजयासह मालिकाही खिशात टाकली.

जयविक्रमचा विक्रम

फिरकीपटू प्रवीण जयविक्रमने पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत 11 बळी टिपून नवा विक्रम केला. पदार्पणाच्या कसोटीत श्रीलंकेसाठीही ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तीन वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत 44 धावांत 8 बळी टिपणाऱऱया अकिला धनंजयचा विक्रम आज जयविक्रमने मोडीत काढला.

बांगलादेशने चौथ्या दिवसाच्या 5 बाद

177 धावसंख्येवरुन सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र लिटन दास रविवारच्या धावसंख्येत 3 धावांची भर घालून 17 धावांवर माघारी परतला. मेहंदी हसनने 39 धावांची संयमी खेळी केली. मात्र, दुसऱया बाजूने साथ न मिळाल्याने बांगलादेशचा पराभव झाला. श्रीलंकेकडून पहिल्या डावात 6 बळी टिपणाऱया प्रवीण जयविक्रमने दुसऱया डावातही 5 फलंदाज बाद केले. रमेश मेंडीसने 4 गडी बाद करून त्याला साथ दिली, तर धनंजया डिसिल्वानेही एक बळी टिपला.

आपली प्रतिक्रिया द्या