श्रीलंका सरकारचे कठोर पाऊल; मॅचफिक्सिंग करणाऱ्याला दहा वर्षे तुरुंगवास

418

मॅच फिक्सिंगचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी श्रीलंका सरकारने यासंदर्भातील सर्व व्यवहारांना कायद्याच्या कक्षेत आणून कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे नव्या कायद्यानुसार श्रीलंकेत मॅच फिक्सिंग करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. असा कायदा करणारा श्रीलंका हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे हे विशेष.

ईएसपीएन क्रिकइन्फोया संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी लंकन संसदेत हे विधेयक सादर केले असून सध्या श्रीलंकेत कॅबिनेट मंत्री असलेल्या अर्जुन रणतुंगानेही याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या विधेयकात खेळाडूंसोबत संघाची गोपनीय माहिती बाहेर देणे, खेळपट्टीची माहिती जाहीर करणे याअंतर्गत क्युरेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आलेले आहे. विधेयकांकर राष्ट्रपतींची मोहर उमटेपर्यंत याचे कायद्यात रूपांतर होणार नाहीये. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुढील दहा दिवसांत या विधेयकाचे अधिकृतपणे कायद्यात रूपांतर होईल. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच मोठी दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या, नुवान झोयसा यांच्यावर आयसीसीने फिक्सिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची बंदी घातली आहे.

सट्टेबाजांशी संपर्क ठेवणे महागात पडणार

सट्टेबाजांकडून संपर्क झाल्यानंतरही त्याची माहिती लपवणेही आता श्रीलंकन क्रिकेटपटूंना महागात पडणार आहे. त्यामुळे सट्टेबाजांनी संपर्क केल्यानंतर खेळाडूंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबरोबरच (एसीयू) नेमण्यात आलेल्या विशेष तपास विभागालाही याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. सट्टेबाजांनी केलेल्या संपर्काची माहितीएसीयूला दिल्याबद्दल नुकतेच बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या