श्रीरामपुरात मोबाईल चोरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याने पायी जाणाऱ्यांचा मोबाईल दुचाकीवर येऊन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पंकज राजू माचरेकर (वय – 20) आणि शाबीर दिलवार शेख (वय – 21, दोघे रा. आंबेडकर कॉलनी, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर) अशी दोघांची नावे आहेत. शेजल चित्ते यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाखालून फिर्यादी पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. या प्रकरणी फिर्यादी चित्ते यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास एलसीबी पो. नि. अनिल कटके करत होते.

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंकज माचरेकर व त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने श्रीरामपूर येथील आरोपी माचरेकर याला पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदार शाबीर शेख असे दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याची माहिती दिली. पथकाने त्याला ताब्यात घेतले. या दोघा आरोपींकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला. दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.