दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारीत चित्रपट, एस.एस.राजामौली यांनी प्रसिद्ध केला ‘मेड इन इंडिया’चा टीझर

हिंदुस्थानात चित्रपटसृष्टीची पहिली वीट रचणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून गणेश चतुर्थीला त्यांनी या चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. ‘मेड इन इंडिया’ असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड करणार आहेत. राजामौली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

लहानपणापासून कलेची आवड

दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये प्रावीण्य मिळवले (1890). याचबरोबर त्यांनी छायाचित्रण, प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथोग्राफी) या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. अहमदाबाद येथील 1892 मधील औद्योगिक प्रदर्शनात त्यांच्या ‘आदर्शगृहा’च्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले. 1895मध्ये त्यांनी गुजरातमधील गोध्रा येथे व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. पण तेथे त्यांचा जम बसला नाही. ते बडोद्याला परतले (1900) पण त्यांच्यातला हरहुन्नरी माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी एका जर्मन जादूगाराकडून जादूची कला शिकून प्रोफेसर केळफा (केल्फा) या नावाने जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. हे प्रयोग त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले.

ख्रिस्तावरील चित्रपट पाहून श्रीकृष्णावर चित्रपट निर्माण करण्याची कल्पना सुचली

दादासाहेबांनी 1903 साली भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पतकरली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. पण स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि चळवळीला साथ देत त्यांनी ही सरकारी नोकरी सोडून दिली (1906). 1908 मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलविली. तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’मध्ये झाले. १९०९मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले (1911). यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले.

तेथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल मागविण्यासाठी नोंदणीही केली व ते भारतात परतले (1 एप्रिल 1912). तेथील वास्तव्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सर्व सामग्री मे महिन्यामध्ये हाताशी आल्यावर प्रयोगादाखल जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एका मिनिटाचा लघुपट तयार केला आणि काही निवडक व्यक्तींना दाखवला. त्याचा योग्य परिणाम वाटल्याने पत्नीचे दागदागिने गहाण ठेवून भांडवल उभे करून लवकरच मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित झाला (3 मे 1913). राजा हरिश्चंद्रच्या यशाने खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटाकरिता लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, संकलनकार, रसायनकार इ. सर्व भूमिका दादासाहेबांनी पार पाडल्या. या चित्रपटांनंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (1913 ), सत्यवान सावित्री (1914) या चित्रपटांची निर्मिती केली. यांनाही चांगले व्यावसायिक यश लाभले. त्यांनी 1914 मध्ये पुन्हा इंग्लंडला प्रयाण केले. या वास्तव्यात त्यांनी निर्मिती केलेले चित्रपटही तेथील निर्मात्यांना दाखवले. या चित्रपटांतील तांत्रिक अंगांचे परदेशातही खूप कौतुक झाले.

लोकमान्य टिळकांचा मदतीसाठी पुढाकार

इंग्लंडहून परतल्यावर पुढील दोन वर्षांत दादासाहेबांनी आगकाड्यांची मौज, नाशिक-त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक-पूर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्‍नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो. 1917 मध्ये त्यांनी लंकादहन हा चित्रपट प्रदर्शित केला. ह्या चित्रपटाने उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. दादासाहेबांची चित्रपट निर्मितीकरिताची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने 5 लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्‍म लिमिटेड’ ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली परंतु ती कार्यान्वित झाली नाही. तथापि कोहिनूर मिल्सचे वामन आपटे, माया भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918 रोजी ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नासिक येथे त्यांनी उभारले.

‘फाळकेज फिल्मस’ या संस्थेद्वारे दादासाहेबांनी दिग्दर्शन केलेले श्रीकृष्णजन्म (1918) व कालिया मर्दन (1919) हे दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले; परंतु या चित्रपटानंतर त्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मन:शांतीसाठी ते 1919 अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून त्याची निर्मिती केली. पण यास व्यावसायिक यश मिळाले नाही. 1922 मध्ये ते कंपनीत परतले. 1934 पर्यंत हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण 97 चित्रपट काढले. त्यांत फाळके यांनी दिग्दर्शन केलेले 40 चित्रपट होते. त्यांनी या कंपनीकडून दिग्दर्शित केलेला सेतुबंधन हा शेवटचा चित्रपट होय (1931). व्यवहार विन्मुखतेमुळे त्यांना निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली तरीही त्याही अवस्थेत वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण (1937) हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला आणि निवृत्ती स्वीकारली.  चित्रपट व्यवसायास 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील महोत्सवात कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून फाळके यांना पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली होती (1939).