
कुरार परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. दहावी, बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीचा फटका बसतो. याची दखल घेऊन कुरारमध्ये परीक्षेच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह ट्रफिक वॉर्डन नियुक्त केले जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे दिलासा मिळाला आहे.
कुरारमधील रस्ते चिंचोळे, अरुंद आहेत. दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास वाहतूककोंडी उद्भवते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असतात. परीक्षा वेगळय़ा केंद्रात आल्याने एका विभागातील मुलांना दुसऱया विभागात जावे लागते. या वाहतूककोंडीमधून वाट काढत जाताना मुलांची आणि पालकांची तारांबळ उडते. महापालिका, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे यांनी समन्वयाने मार्ग काढावा यासाठी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी समन्वय बैठक घेतली. बैठकीला परिमंडळ-12 चे डीसीपी डॉ. डी. एस. स्वामी, महापालिका उपायुक्त परिमंडळ-4 चे ढेकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तर परिक्षेत्र वाहतूक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष जाधव उपस्थित होते.
परीक्षेच्या काळात रमेश हॉटेल नाका, परी हॉटेल नाका, एसबीआय नाका येथे वाहतूक पोलिसांसह ट्रफिक वॉर्डन नियुक्त केले जाणार असून त्यांना युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी सेना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करतील. तसेच परीक्षा केंद्रावर जाण्याच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी डॉ. स्वामी आणि डीएमसी ढाकणे यांनी दिली
यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, नगरसेवक तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरार पोलीस ठाणे बाबासाहेब साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, उपविभागप्रमुख गणपत वारीसे, भाई परब, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.
























































