एसटीचा संप मिटेना; कामगार ठाम, 24 तासांची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांना भडकविण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच असून अजून संपाची काsंडी फुटलेली नाही. त्यातच महामंडळाने कठोर पावले उचलत 2,296 रोजंदारी कर्मचाऱयांना 24 तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, बुधवारी 7,400 कर्मचारी कामावर परतले असून एसटी महामंडळाने विविध भागांत 107 बसेस चालवून 2899 प्रवाशांची वाहतूक केली आहे.

शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. आझाद मैदानात संपकरी धरणे आंदोलक ठिय्या मांडून बसले असून अजूनही कामावर परतण्याच्या मनस्थितीत ते दिसत नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण 2,178 कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. तर रोजंदारीवर काम करणाऱया 2,296 कर्मचाऱयांना 24 तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एसटी महामंडळात एकूण 2,584 रोजंदारी कामगार आहेत. त्यापैकी 2296 रोजंदारी कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली असून सेवा समाप्तीची नोटीस बजावलेल्यांमध्ये 25 चालक, 2101 चालक कम वाहक, 132 वाहक, 22 सहाय्यक, 16 लिपिक-टंकलेखकांचा समावेश असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे.

सातारा आणि धाराशीव येथील दोघा एसटी कर्मचाऱयांचा हृदयविकाराने मृत्यू

एकीकडे एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असताना सातारा आणि धाराशीव येथील दोघा एसटी कर्मचाऱयांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा जिह्यातील मेढा आगारातील एसटी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. संतोष वसंत शिदें (रा. आसगाव, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या चालक कम वाहकाचे नाव आहे. संतोष शिंदे याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. दुसऱया घटनेत धाराशीव जिह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱयांनी केला आहे. किरण घोडके असे या मृत कर्मचाऱयाचे नाव आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱयांच्या आंदोलनात ते सहभागी होते.

107 बसेसद्वारे 2899 प्रवाशांची वाहतूक

महामंडळाचे 7400 कर्मचारी कामावर परतले असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुणे ते दादर, ठाणे, नाशिक, मिरज, सांगली, संभाजीनगर, बोरिवली ते नाशिक, मुंबई ते पनवेल, ठाणे ते बोरिवली, दादर ते स्वारगेट अशा मार्गांवर खासगी शिवशाही, शिवनेरी आणि साध्या 107 बसेसद्वारे 2899 प्रवाशांची वाहतूक केली.