एसटीचे स्टेअरिंग आता यांत्रिक कर्मचाऱयांच्या हाती, उजळणी प्रशिक्षण देऊन लालपरी चालवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने कर्मचाऱयांचा संप संपत नसल्याने आता प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटीचे स्टेअरिंग आपल्या यांत्रिक कर्मचाऱयांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन संपकाळात त्यांचा वापर ‘चालक’ म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा वापर ‘वाहक’ म्हणून करण्यात येणार आहे.

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असून ग्रामीण भागात त्याची सर्वाधिक झळ बसत आहे. आतापर्यंत एसटीचे 26 हजार कर्मचारी कामावर हजर झाले असून त्यात बहुतांशी डेपोतील यांत्रिकी कर्मचारी आहेत. एसटीची धुरा प्रामुख्याने ज्यांच्यावर असते ते चालक व वाहक अजूनही गैरहजर असल्याने एसटीची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे एसटीने यांत्रिक कर्मचाऱयांना चालक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी होणार चालक व वाहकांची नेमणूक

पहिल्या टप्प्यात ज्यांना वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडे प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला आहे अशा कर्मचाऱयांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर चालक म्हणून करण्यात येणार आहे. दुसऱया टप्प्यात ज्या यांत्रिक कर्मचाऱयांकडे अवजड वाहन चालक परवाना आहे अशा यांत्रिकी कर्मचाऱयांची माहिती विभागीय पातळीवर संकलित करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱयांना आरटीओ कार्यालयात ऑनलाइन अर्ज करण्यास सांगून त्यांचा प्रवासी वाहन चालक परवाना काढण्यात येणार आहे. तसेच त्यांना महामंडळातर्फे सात दिवसांचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संपकाळात अशी सेवा केल्याबद्दल अशा कर्मचाऱयांना प्रतिदिन 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.