
गणेशभक्तांच्या सेवेत धावलेल्या एसटी महामंडळाच्या बस गाड्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा मोठा फटका बसला आहे. खड्ड्यांचे दणके बसून एसटीच्या अनेक गाड्या खिळखिळ्या झाल्या. त्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. महामार्गाच्या कामातील सरकारच्या निक्रियतेमुळे ही वेळ आल्याची नाराजी एसटीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबईकर आणि ठाणेकरांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा 5 हजार जादा गाड्यांची व्यवस्था केली. या गाड्यांचे नियोजन करण्यासाठी महामंडळाने मराठवाड्यातून बसगाड्या मागवल्या. मात्र बहुतांश गाड्या जुन्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे त्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. एकीकडे खड्ड्यांचा त्रास प्रवाशांनी सहन केला, तर एसटी महामंडळाला गाड्या दुरुस्तीवरील खर्चापोटी मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्ग तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याचा गाड्यांवर परिणाम झाल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकऱ्यांनी मान्य केले. मुंबईकर आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी परजिह्यांतून मागावलेल्या बसगाड्या दुरुस्त करून त्या-त्या विभागांमध्ये पाठवाव्या लागत आहेत. एसटीच्या कार्यशाळांमध्ये तांत्रिक कामगारांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यात गणपती स्पेशल गाड्यांच्या दुरुस्तीचा ताण वाढल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
वाढीव खर्चाचा भुर्दंड महामंडळाच्या माथी
सरकारने गणेशोत्सव काळातील ग्रुप बुकिंगवर 30 टक्क्यांची दरवाढ केली होती. त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर एकाच दिवसात दरवाढ रद्द केली. त्या अधिभाराची रक्कम गाड्यांच्या दुरुस्तीवर वापरली असती. अधिभाराचे ते परिपत्रक रद्द केल्यामुळे आता गाड्यांवरील दुरुस्तीच्या वाढीव खर्चाचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार आहे. जादा गाड्यांचे श्रेय घेण्यात पुढे असणारे सरकार महामंडळाला आर्थिक मदत करण्याकामी आखडता हात घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.