
सामना प्रतिनिधी, मुंबई
अतिवृष्टीमुळे मुंबई ते पुणे मार्गावर रेल्वे सेवा खंडित झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर शिवनेरीच्या 32 जादा फेऱया सुरू केल्या आहेत. परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार रेल्वे सेवा सुरळीत होईपर्यंत ही सेवा पुरविली जाणार आहे.
कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या मेल-एक्सप्रेस मध्य रेल्वेने पुढील काही दिवसांसाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेने प्रवास करणाऱया हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने (मुंबई-पुणे) दररोज शिवनेरीच्या जादा फेऱया सोडण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत एसटीच्या नेहमीच्या अधिकृत थांब्यावरून दादर, बोरिवली, ठाणे तसेच पुण्यातील स्वारगेट थांब्यावरून बसेस सोडण्यात येत आहेत. तसेच मागणीनुसार साध्या बसेससुद्धा या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.



























































