
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभर अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवून कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असून सर्वांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
दररोज लाखो प्रवाशी एसटीच्या प्रवासाद्वारे प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाऱ्या वर्तनाविरुद्ध एसटी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. प्राप्त तक्रारींनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षा व दक्षता खात्याला राज्यभरातील सर्व विभागांत अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 28 ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता राबविलेल्या या मोहिमेत 1 हजार 701 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात 719 चालक, 524 वाहक आणि 458 यांत्रिक कर्मचारी होते. तपासणीत 7 कर्मचारी मद्यपान केलेले आढळले.
 
             
		



































 
     
    


















