
देवगड-मुंबई परतीच्या प्रवासाकरिता चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजेच एसटीला पसंती दिली आहे. गौरी-गणपती सणाला देवगड तालुक्यात आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी करिता देवगड आगाराने जादा प्रवासी फेऱ्यांची सुविधा केली आहे. शनिवार, रविवार या दोन दिवसात 21 प्रवासी फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्य. त्याआधी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर 4 जादा प्रवासी फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. अशा एकूण 25 प्रवासी फेऱ्यांद्वारे मुंबईकर चाकरमानी बोरिवली , कुर्ला, मुंबई ठाणे, या भागात रवाना होत आहेत. तसेच अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन सोहळ्यानंतरही प्रवासी फेऱ्यांची सोय करण्यात आली आहे.
गौरी गणपती सणात मुंबईकर चाकरमान्यांना गावाला जाण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मुंबईहून कोकणासाठी एस.टी. सेवा सुरू करण्यात आली होती. त्यात देवगड आगारात मोजक्या 9 ते 10 प्रवासी फेऱ्यांमधून सुमारे 200 च्या आसपास चाकरमानी दाखल झाले होते. मात्र, खाजगी वाहनातून आलेल्या प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे मुंबई, बोरिवली उपनगरात परतीच्या प्रवासात प्रवाशांची वाढ झाली. तसेच ग्रुप बुकिंग, ऑनलाईन, ऑफलाईन आरक्षण सुविधा निर्माण करून देण्यात आली. त्यामुळे ई पासशिवाय चाकरमान्यांना प्रवास करणे शक्य झाले. एसटीची डागडुजी ,सॅनिटायजेशन, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत प्रवाशांना सेवा देण्यात आली. मुंबई, बोरिवली या भागातील प्रवासी फेऱ्यांसह देवगड आगाराने पुणे, अक्कलकोट, रत्नागिरी, या मार्गावर तसेच ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ करून गणेशोत्सवात अधिकाधिक प्रवासी सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.


























































