
राज्यातील एस. टी. बसस्थानकाचा विकास बी. ओ. टी. तत्वावर करण्याचे जे धोरण पूर्वीच्या शासनाने ठरवले होते ते रद्द करून आता राज्यातील सर्व बसस्थानकांचा विकास परिवहन महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून यामुळे एस. टी. बसस्थानकाच्या जागेचा गैरवापर आता होणार नसल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. येथील जुन्या बसस्थानकाचे एक कोट एकावन्न लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन आज रावते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार मोनिका राजळे,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जि.प. सदस्य अनिल कराळे,नगराध्यक्ष डॉ. मृत्युन्जय गर्जे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चिंतळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, पं. स. उपसभापती विष्णुपंत अकोलकर, रफिक शेख यांच्यासह राजळे यांच्या यांच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना दिवाकर रावते म्हणाले की आमदार मोनिका राजळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आपण पाथर्डी व शेवगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी निधी दिला आहे.
एस. टी. मुळे दिव्यांग, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची मोठी सोय झाली असली तरीही आपण सर्वच जण खासगी वाहतूक करणाऱ्या कंपनीचे कौतुक करतो ते चुकीचे आहे. राज्यातील एस. टी. बसस्थानकाची जागा ही आपल्याच मालकीची आहे असे समजत अनेकांनी त्याचा गैरवापर केला मात्र तो रोखण्यासाठी आता राज्यशासनाने पुढाकार घेत राज्यातील सर्व बसस्थानकाच्या विकास करण्याचे धोरण अवलंबले असून प्रायोगिक तत्वावर सध्या 192 ठिकाणी या पद्धतीने कामे सुरू करण्यात आली असून चंद्रपूर व वर्धा येथील बसस्थानकाची कामे पूर्ण झाली आहेत. एखाद्या विमानतळावर गेल्या नंतर जो अनुभव प्रवाशांना येतो तसा अनुभव आता एस. टी. च्या प्रवाशांना येणार आहे. या पूर्वी बी. टी. ओ. तत्वावर काही व्यापारी बससथनकाचा विकास करत होते मात्र त्याचा गैरवापरही ते करत असल्याने बसस्थानकाचा विकास स्वतः करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील एक लक्ष पाच हजार कर्मचारी परिवहन मंडळात काम करत असून त्यांच्या घामावरच आज राज्यात सर्वत्र एस. टी. चे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणच्या बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य असते हे ध्यानात घेऊन आता सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात येणार आहे. प्रवासी हे आपले अन्नदाते असून बसस्थानक हे आपले घर आहे असे समजून त्याची सर्वानी काळजी घ्यावी असे आवाहन शेवटी त्यांनी केले. प्रास्ताविक आमदार मोनिका राजळे सूत्रसंचालन राजू सुरवसे तर आभार माणिक खेडकर यांनी मानले.























































