एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अखेर झाला, सरकारने दिलेला 550 कोटींचा निधी अखेर कामाला आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

एसटी महामंडळाच्या कामगारांना अखेर त्यांचे पावणेदोन महिन्यांचे रखडलेले वेतन अदा करण्यात आले आहे. 4 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने 550 कोटी रुपयांचा निधी महामंडळास मंजूर केल्याने एसटी कर्मचाऱयांना त्यांचा पावणेदोन महिन्याचा रखडलेला पगार बँकेत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीत कामगारांना ही भेट मिळाली आहे.

एसटी महामंडळासमोरील आर्थिक पेचासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत 4 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक झाली होती. त्यात एस.टी. कामगारांच्या वेतनाकरीता 550 कोटी रुपयांचा निधी सवलत मुल्यांचा प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून देण्यात आला. या रकमेतून एसटी कामगारांचे शिल्लक राहिलेले माहे मार्च महिन्याचे 25 टक्के मे महिन्याचे 50 टक्के व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात आले आहे. जुलै महिन्याचे वेतन मात्र अद्याप देण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय स्टेट बँक या बँकेत खाते आहे अशा कर्मचाऱ्यांचे वेतन आज त्यांच्या खात्यात जमा झाले. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि. या बँकेत पगार खाते असणा-यांचे वेतन सोमवारी जमा होईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.