
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या 93 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी 1 नोव्हेंबरला होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी महागाईभत्त्यात वाढ करावी, अशी मागणी केली होती. या मागणीला परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाईभत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाईभत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय ऍड. परब यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आता 17 टक्के होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल ऍड. परब यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
































































