…तर संपकरी कर्मचाऱयांवर ‘मेस्मा’ कारवाई, परिवहनमंत्र्यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांच्या संपावर राज्य सरकारने आतापर्यंत सहानुभूतीने घेतले आहे, पण या संपामुळे राज्यातील गाव आणि तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱयांवर ‘मेस्मा’अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सरकार करत आहे. एसटी सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱयांना ‘मेस्मा’ लागू शकतो, असा इशारा परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिला आहे.

एसटी महामंडळाच्या काही अधिकाऱयांसोबत मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात अनिल परब यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनिल परब म्हणाले, एसटी अत्यावश्यक सेवेत येते. ‘मेस्मा’ हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो. 1917 सालच्या कायद्यानुसार एसटीही अत्यावश्यक सेवेत मोडते. ‘मेस्मा’ कायदा एसटी कर्मचाऱयांसाठी लागू शकतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ‘मेस्मा’चा निर्णय घेऊ, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

विलीनीकरणाबाबत जो अहवाल समिती देईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्दय़ावरून जे कर्मचारी आंदोलन करीत आहेत त्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, महाराष्ट्र सरकारने सहानुभूतीने सर्व कर्मचाऱयांना अतिशय चांगल्या पद्धतीने पगारवाढ दिली. पगारवाढीचे लेखी आदेश आम्ही काढलेले आहेत. त्यामुळे ही पगारवाढ फसवी आणि तात्पुरती आहे, अशा खोटय़ा बातम्या चर्चेत आहेत. त्या सर्व खोटय़ा बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. अशाही अफवा पसरवल्या जात आहेत की, 60 दिवस एसटीचा संप सुरू राहिला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही. जे कामगार कामावर येत आहेत तर त्यांना विलीनीकरणात घेतले जाणार नाही अशा अफवा पसरविल्या जात आहेत, पण तसे काहीच होणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन परब यांनी केले.

59 आगारांतील वाहतूक सुरू

एसटी महामंडळाच्या राज्यातील 250 पैकी 59 आगारांतील वाहतुकीला सुरूवात झाली असून शुक्रवारी रात्री 7 वाजेपर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 1,331 बसेस विविध मार्गांवर चालविण्यात आल्या. यात 1076 साध्या, 190 शिवशाही, 65 शिवनेरी बसेसचा समावेश होता.

9384 कर्मचारी निलंबित; 61 जणांची सेवा समाप्त

एसटी महामंडळाने शुक्रवारी 192 कर्मचाऱयांना सेवेतून निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱयांची संख्या 9,384 इतकी झाली आहे. तर आज 61 कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली असून एकूण सेवा समात्प झालेल्या कामगारांची संख्या आता 1980 इतकी झाली आहे.

एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱयांना निलंबनाच्या नोटीस देऊन त्यांना डयूटीवर हजर राहण्यास बजावले आहे. या कर्मचाऱयांना 14 दिवसांचा अवधी देण्यात येतो. त्यानंतर त्यांचा जबाब घेतला जातो आणि त्यानुसार पुढील वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. त्यात एक दिवसाच्या संपाच्या बदल्यात आठ दिवसांची पगार कपात अशा प्रकारच्या शिक्षा केल्या जात असून सेवेतून बडतर्फीपर्यंतच्या शिक्षेचा यात समावेश आहे. अजूनपर्यंत निलंबित कर्मचाऱयांना बडतर्फ केलेले नाही. परंतु रोजंदारी कर्मचाऱयांनी संपात सहभाग घेतल्याने त्यांची मात्र सेवा समाप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 1980 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

कामावर येणाऱयांना त्रास दिल्यास कठोर कारवाई

जे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत त्यांना त्रास दिला जातोय, त्यांना शिवीगाळ केली जात आहे. या घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विलीनीकरणाचा मुद्दा रास्त आहे. त्यामुळे ज्या व्यासपीठावर हा मुद्दा मांडायचाय तेथे मांडा; पण त्यासाठी सगळ्यांना वेठीस धरू नका. जर कामावर येणाऱया कामगारांना अडविण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यावर कुणाचीही पर्वा न करता अतिशय कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले.