बीड जिल्ह्यात शुक्रवारपासून एसटी सेवा सुरू होणार

491

सरकारच्या आदेशानुसार एसटी महामंडळाची सेवा शुक्रवारपासून सुरू होत आहे. आसन क्षमतेच्या 50% प्रवाशांना महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे. दोन महिन्यांपासून कोरोना रोखण्यासाठी राज्यभरातील लाल परी जागेवरच उभी होती. मात्र, शासनाने शुक्रवारपासून (22 मेपासून) काही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू होणार आहे. मात्र, आसनक्षमतेच्या 50% प्रवासीच बसमधून प्रवास करू शकणार आहेत.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता बस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोनामुक्त तालुक्यात किंवा गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना या सेवेमुळे घरी परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांमधून बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या