
एसटीची लाल परी आता स्मार्ट होणार आहे. एसटीमध्ये नव्या स्मार्ट बसेसचा समावेश केला जाणार आहे. त्या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अद्ययावत यंत्रणा असणार आहे. चोऱ्या रोखण्यासाठी बस लॉक सिस्टम असेल तसेच एआय कॅमेरे, जीपीएस, एलईडी टीव्ही, वाय-फाय आणि चालकाची ‘तळीराम’ चाचणी करण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरही असणार आहे.
भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बससेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीसाठी नव्या तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बस बांधणी कंपन्यांची बैठक आज परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती. त्यात या स्मार्ट बसेसबाबत चर्चा झाली.
आग प्रतिबंधक यंत्रणा
एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडतात. त्या रोखण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्ज्वलित होईल त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी फोन वापरून आग विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत आहे.