
यंदा 98 व्या वर्षात पदार्पण केलेले संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे मुंबईतील सर्वात जुने मंडळ आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘पखरण’ या मंडळाच्या वार्षिक अंकाचे अनावरण नुकतेच ‘पखरण-संवादाच्या पडद्याआड’ या सोहळ्याद्वारे ऑनलाइन पार पडले. या अंकामध्ये महाविद्यालयाच्या तरुण उदयोन्मुख लेखक, कवींच्या साहित्याची उत्कृष्ट मांडणी केली आहे. हा अंक यंदा ऑनलाइन आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे.
‘पखरण’ म्हणजे विचारांची उधळण. यंदाचा अंक संवाद या विषयावर बेतलेला आहे. संवादाच्या विविध पैलूंवर भर देण्याचा प्रयत्न होता. दैनंदिन संवादामध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’ नावाचा अदृश्य पडदा निर्माण झाला आहे. हा पडदा बाजूला सारून ‘संवादाच्या पडद्याआड’ ही थीम निवडत यंदाच्या पखरणमधून संवादाचे विविध पैलू उलगडायचे ठरवले, असे संपादिका कार्तिकी अरकल हिने सांगितले.
यावेळी काय सांगशील ज्ञानदा?, बोल बिनधास्त, द आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन अशी तीन इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन्स अनुक्रमे सुप्रसिद्ध पत्रकार ज्ञानदा कदम, कलाकार मैथीली आपटे आणि अमन शुक्ला यांसोबत आयोजित केली होती. यावेळी कवी, गीतकार वैभव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे व मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात मंडळाच्या जनसंपर्क विभागाचा मोठा वाटा होता.अधिक महितीसाठी mvm.xaviers या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला भेट द्या.
n ऑडिओ बुकमध्ये मंडळाच्या सदस्यांनी स्वतः रचलेले पार्श्वसंगीत आहे. जास्तीत जास्त वाचकप्रेमींपर्यंत पोहोचणे आणि एक सर्वसमावेशक अंक प्रस्तुत करावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. ज्या व्यक्तींना मराठी वाचता येत नसेल, जे वाचकप्रेमी दृष्टिहीनता किंवा तत्सम आजाराने ग्रस्त असतील अशांना अंकाचा आनंद घेता यावा यासाठी यामधील लेखांचे श्राव्य माध्यमात रूपांतर करण्यात आले आहे.


























































