
शासकीय कामांमध्ये महत्वाचा दस्तऐवज समजल्या जाणार्या स्टॅम्पपेपर्सचा सध्या अलिबाग शहरात तुटवडा जाणवतो आहे. महत्वाचे म्हणजे हा तुटवडा कृत्रिम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुद्रांक विक्रेत्यांकडे चौकशी केली असता स्टॅम्पपेपर्स उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून शासकीय कामानिमित्त शहरात येणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना आपला रोजगार बुडवून 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरसाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत व दिलीप जोग यांना याची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला मुद्रांक जिल्हाधिकारी शिंदे यांची भेट घेतली. सबंधीत मुद्रांक विक्रेत्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात बोलावून घेतल्यावर त्यांनी स्टेट बॅंकेमध्ये भरणा करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने स्टॅम्प पेपर घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर दिलीप जोग यांनी शहरामध्ये इतर विक्रेत्यांना या अडचणी येत नसून त्यांच्याकडे स्टॅम्पपेपर कसे मिळतात असा प्रश्न उपस्थित केला.
मुद्रांक विक्रेत्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची नागरीकांची तक्रार आहे. यासंदर्भात जिल्हा कोषागार अधिकारी यांनी मात्र स्टॅम्प पेपर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांकडून त्यांची विक्री थांबवून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचे समोर आले आहे. नागरीकांच्या तक्रारीनंतर मुद्रांक जिल्हाधिकारी शिंदे यांनी मुद्रांक विक्रेत्यांना बोलावून घेवून समज दिली आहे.
तहसिलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, न्यायालय ही सर्वसामान्य लोकांची नियमीत येण्या जाण्याची वर्दळीची ठिकाणे आहेत. या परीसरात 4 ते 5 मुद्रांक विक्रेते आहेत. परंतु एकाकडेही स्टॅम्प पेपर्स उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना अनेकदा स्टॅम्पपेपर्स कुठे मिळतात याचीच कल्पना नसते अशावेळी कुणाला तरी विचारून ते मुद्रांक विक्रेत्याला गाठतात परंतु त्यांची निराशा होत असते, असे चित्र अनेकदा पहायला मिळते. यातून नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
रायगड जिल्हा कोषागारात मुद्रांक शुल्काचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. मुद्रांक विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असते असे जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला यांनी स्पष्ट केले. तर मुद्रांक उपलब्ध होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात आज समक्ष केलेल्या चर्चेनुसार सबंधीत मुद्रांक विक्रेत्यांना बोलावून घेऊन समज देण्यात आली आहे. लवकरच त्यांना लेखी सुचनाही देण्यात येत आहेत असे जिल्हा मुद्रांक अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
























































