‘टाटा’ला मालाड सांडपाणी प्रकल्प सल्लागार नेमण्यास स्थायी समितीचा विरोध, नियमबाह्य काम दिल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या प्रस्ताकित मालाड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा सल्लागार म्हणून ‘टाटा’ कंपनीची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने विरोध केला आहे. ‘टाटा’ची नेमणूक करताना नियम डावलून काम दिल्याचा आरोप करण्यात आला. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून हा मुद्दा उपस्थित केला. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे प्रस्ताव रद्द करून नव्याने मांडण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत. पाच केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर सहाव्या केंद्रासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. पालिकेने हे काम मे. टाटा कन्सल्टन्सीला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यापूर्वीची पाचही कामे टाटाला दिली आहेत.

मागील स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी यावरुन प्रशासनाला धारेवर धरले होते. तसेच एका ठेकेदाराला दोन किंवा तीन कामे देण्याची मर्यादा आहे. तरीही एकाच ठेकेदाराला सहा कामे कशी दिली, पालिका अधिनियमांचा हा भंग आहे, अशी टीका करत प्रस्ताव बदलून आणण्याची सूचना नगरसेककांनी केली. हे काम टाटा कंन्सल्टन्सी न देता दुसरा लघुत्तम निविदाकार मे. एम. जे. एस. इंजिनिअर प्रा.लि. कंपनीला काम देण्यात यावे, अशी सूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली.

एकाच ठेकेदाराला पाच कामे देण्याचा नियम नसताना मलजल प्रकल्प अभियंता नियमबाह्य पद्धतीने काम कसे करतात असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केले.