स्थायी, परिवहन समित्यांची आज निवडणूक

सोलापूर महापालिकेतील स्थायी समिती व परिहवन समिती सभापतिपदाची निवडणूक 5 मार्च रोजी होणार आहे. या दोन्ही सभागृहांत महाविकास आघाडी मजबूत असल्याने निवडणूक रंगणार आहे. 4 मार्च रोजी दुपारी दोनपर्यंत सभापतिपदासाठी अर्ज दाखल करता येणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्याचे भूजल सर्वेक्षण संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापतीची निवड गेल्या वर्षीपासून रखडली होती. नुकताच न्यायालयाने आदेश दिला असून, या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. स्थायी समितीत महाविकास आघाडी व भाजपचे समसमान सदस्य आहेत. भाजपचे 8, शिवसेना 3, काँग्रेस 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य आहे.

परिवहन समितीत स्थायी सभापतीचे मत ठरणार निर्णायक

– परिवहन समितीमध्ये 12 सदस्य असून, येथेही महाविकास आघाडीचे सहा व भाजपचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे समितीच्या सभापतिपदासाठी रंगत वाढली आहे. स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असून, त्याचे मत निर्णायक ठरणार आहे. स्थायी समितीच्या सभापती निवडीनंतरच परिवहन समिती सभापतीची निवड होणार आहे. जो स्थायी समिती सभापतिपद जिंकेल, तोच पक्ष परिवहन समितीवरही आपले वर्चस्व ठेवणार असल्याने महाविकास आघाडी व भाजपकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे.

भाजपच्या सभागृहनेत्यांना उंबरठाही चढू दिला नाही!

– सत्ताधारी-विरोधकांचे संख्याबळ समसमान असल्याने इच्छुकांची गर्दी वाढल्याने ही निवडणूक रंगली आहे. भाजपमधील असंतुष्ट दोन सदस्य ऐन मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपमध्ये बंडाळी सुरू असून, व्हिप बजाविण्यास गेलेले सभागृहनेते श्रीनिवास करली यांना दोन सदस्यांनी घराचा उंबरठाही चढू न दिल्याने बाका प्रसंग निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या