
सनरायझर्स हैदराबादने IPL 2025 मध्ये चाहत्यांना निराश केलं. संघाचा खेळ अगदीच सुमार राहिल्यामुळे साखळी फेरीतीच बाद होण्याची नामुष्की संघावर ओढवली. मात्र स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात संघाने दमदार खेळ करत स्पर्धेचा शेवट गोड केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात लक्ष वेधून घेणारी फलंदाजी केली ती हेन्रीक क्लासेनन. त्याने चौफेर फटकेबाजी करत 39 चेंडूंमध्ये 105 धावांची वादळी खेळी केली. याच क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज म्हणून जगभरात आपल्या नावाचा डंका क्लासेनने वाजवला. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. फक्त 33 वर्षांच्या असणाऱ्या क्लासेनने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. “हा माझ्यासाठी खूपच दु:खाचा दिवस आहे. कारण मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करत आहे. हा खूपच कठीन निर्णय आहे, पण मी पूर्णपणे समाधानी आहे. पहिल्या दिवसापासूनच देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती,” अशी एक भावूक पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी क्सासेनने 4 कसोटी सामने खेळले असून 104 धावा केल्या आहेत. तसेच 60 वनडे सामन्यांमध्ये 2141 धावा केल्या असून टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 58 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जगभरातील लीग क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने वेळोवेळी आपल्या विस्फोटक फलंदाजीचा जलवा दाखवला आहे.