साय-फाय – ‘स्टारलाइनर’ एक फसलेली मोहीम

>> प्रसाद ताम्हनकर

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर या अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना परत पृथ्वीवर आणण्याची मोहीम नासाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी यासंदर्भात पुढचा निर्णय घेतला जाणार आहे असे नासाने कळवले आहे. 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर या दोन अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे बोईंग स्टारलाइनर या अवकाश यानातून उड्डाण केले. ही मोहीम यशस्वी करून ते आठ दिवसांत पृथ्वीवर परतणार असे नियोजन करण्यात आले होते. मात्र अवकाश यानात तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ते अंतराळ स्थानकात दोन महिने झाले तरी अडकून पडले आहेत. आठ दिवसांची ही मोहीम आता आठ महिन्यांपर्यंत चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत स्पेस एक्सचे यान वापरून त्यांना परत आणण्याचा पर्याय सध्या प्रामुख्याने चर्चेत आहे.

नासाने हे दोन अंतराळवीर पूर्ण सुरक्षित असून दोघांनी अंतराळ स्थानकात असलेल्या वातावरणाशी जुळवून घेतले असल्याचे सांगितले. विल्मर यांचे वय 61, तर सुनीता यांचे वय 58 आहे. दोघे पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांना मोहिमेपूर्वी ही मोहीम परिपूर्ण नसून एक चाचणी मोहीम असल्याची कल्पना देण्यात आलेली होती असे नासाने स्पष्ट केले आहे. दोन्ही अंतराळवीरांना अशा मोहिमेत अचानक येऊ शकणाऱया संकटांना आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे असेदेखील नासाने नमूद केले आहे.

स्टारलाइनर या यानाने पृथ्वीवरून यशस्वी उड्डाण केले. मात्र अंतराळ स्थानकापाशी पोहोचल्यावर या यानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. या अंतराळ यानाला दिशा देणारे पाच थ्रस्टर अचानक बंद पडले. यानातील हेलियमदेखील संपल्याने यानाला जळत्या इंधनावर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली. जोवर या समस्यांचे निराकरण होणार नाही, तोवर दोन्ही अंतराळवीरांना अवकाश स्थानकात अडकून पडावे लागणार आहे. वर्षाच्या शेवटी जर स्पेस एक्सच्या यानाच्या मदतीने त्यांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले तरी त्यांना पृथ्वीवर परतण्यासाठी 2025 साल उजाडणार आहे. असे झाल्यास दोघांचाही नाताळ उत्सव आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या या अंतराळातच साजऱ्या होणार आहेत.

प्रदीर्घ काळ अंतराळात राहिल्याने मानवी आरोग्यावर आणि शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या दोघांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जात आहे. स्टारलाइनर हे यान या मोहिमेसाठी वापरण्यात आले होते. हे यान दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी पुन्हा सुरक्षितपणे वापरता येऊ शकते असे नासाने स्पष्ट केले आहे. मात्र नासाच्या या खात्रीवर अनेक अवकाश तज्ञांना शंका आहे. या दोन्ही प्रवाशांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सचे अंतराळ यान हा एकमेव योग्य पर्याय असल्याचे ते ठामपणे सांगत आहेत. अंतराळवीरांनी घातलेले स्पेस सूट एकमेकांशी बदलणे शक्य नाही आणि स्पेस सूटशिवाय परतीचा प्रवास करणे हे अत्यंत धोक्याचे असल्याने स्पेस एक्सच्या यानाचा वापर करण्यासाठी त्यांना योग्य पद्धतीचे स्पेस सूटदेखील पुरवावे लागणार आहेत.

दोन्ही अंतराळवीरांच्या परतीसाठी नासा गंभीरपणे नियोजन करत आहे. सध्या या दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्या स्टारलाइनर या यानात परत आणणे हा नासाचा प्रमुख उद्देश्य आहे. मात्र यात काही अडचणी उद्भवल्यास सप्टेंबरमध्ये ‘स्पेस एक्स क्रू ड्रगन’ या यानाच्या मदतीने जी अंतराळ स्थानकाची मोहीम आखण्यात आली आहे, त्या मोहिमेमध्ये या दोघांचा समावेश केला जाणार आहे. ‘स्पेस एक्स क्रू ड्रगन’मध्ये चार अंतराळवीरांसाठी जागा आहे. अशा परिस्थितीत दोन जागा मोकळय़ा सोडून ही मोहीम फक्त दोन अंतराळवीरांच्या मदतीने आखली जाईल आणि मोहीम यशस्वी करून परतीच्या प्रवासात या यानातील दोन मोकळय़ा जागा या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्यासाठी उपयोगात आणल्या जातील. स्पेस एक्स या कंपनीने या पूर्वी अंतराळवीरांच्या मदतीने नऊ यशस्वी अवकाश उड्डाणे केली आहेत. मात्र स्टारलाइनर ही बोईंग कंपनीची पहिली मानवी मदतीने केलेली मोहीम आहे. जर स्टारलाइनरचा पर्याय रद्द होऊन स्पेस एक्स कंपनीच्या यानाने दोन्ही अंतराळवीर परत आले, तर बोईंगसाठी तो एक मोठा झटका ठरणार आहे.
[email protected]