
एकापाठोपाठ एक पेन ड्राइव्ह विधानसभेत फडकावून राजकीय खळबळ उडवून देणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी असा काही ‘ड्राइव्ह’ मारला की त्यामुळे फडणवीसांना ‘नक्कीच पेन’ (वेदना) झाल्या असणार. मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करीत फडणवीसांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर तुम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री होतात तेव्हाच या प्रकरणाची चौकशी का केली नाही, असा सवाल गृहमंत्र्यांनी केला. राज्याच्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे असे सांगता. पण दुसरीकडे पोलिसांवरच अविश्वास दाखवत ‘पेन ड्राइव्ह’ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा अशी मागणी करता हे बरोबर नाही, असा टोलाही गृहमंत्र्यांनी हाणला. दरम्यान, फडणवीस यांनी विधानसभाध्यक्षांकडे दिलेल्या ‘पेन ड्राइव्ह’मधील ध्वनिचित्रमुद्रण लगेचच मीडियाकडे कसे पोहोचले, असा सवाल करत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आहे.
गोपनीय माहिती फुटल्यावरून विधिमंडळात जोरदार रणकंदन झाले. देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस पाठवणे म्हणजे सदस्याच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे भाजप सदस्यांचे म्हणणे होते. मात्र गृहमंत्री वळसे-पाटील यांनी फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नव्हती तर त्यांना उपलब्ध झालेली माहिती कुठून मिळाली हे जाणून घेण्यासाठी त्यांचा जबाब महत्त्वाचा होता, म्हणून नोटीस पाठवली असे सांगितले.
अधिकाऱयांना योग्य वाटले त्यानुसार तपास सुरू आहे
काही महिन्यांपूर्वी राज्यात अशी एक घटना घडली की, राज्याच्या एसआयडी कार्यालयातून विनापरवानगी फोन टॅपिंग केले गेले. फोन टॅपिंग झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी हा विषय सभागृहात मांडला होता. या विषयासंदर्भात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीने अहवाल दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. अर्थात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची उकल करण्याचे काम तपास अधिकाऱयांचे असते. तपास अधिकाऱयांना जे योग्य वाटले, त्यानुसार तपास सुरू केला आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
पेन ड्राइव्ह मिळावे यासाठी पोलिसांची केंद्रीय सचिवांकडे मागणी
विरोधी पक्षनेत्यांनी पेन ड्राइव्हद्वारे केंद्रीय गृह सचिवांना माहिती दिली होती. पोलीस विभागाने केंद्रीय सचिवांनादेखील पत्र लिहून तो पेन ड्राइव्ह मिळावा, अशी मागणी केल्याचे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
तुरुंगाला घाबरणार नाही – फडणवीस
प्रश्नावलीतले प्रश्न आणि काल विचारलेले प्रश्न यात फरक होता. प्रश्नावलीतले प्रश्न हे साक्षीदाराकरता होते. काल जे प्रश्न विचारले ते आरोपीकरता होते. प्रश्न बदलल्याने काही फरक पडत नाही. तुरुंगात जाण्यासाठी घाबरणारे आम्ही नाहीत. यासंदर्भात कायदेशीर लढाई असेल ती लढू, असे फडणवीस म्हणाले.
पेन ड्राइव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राइव्हचा तपास आपण करणार आहोत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास सीआयडीकडे सोपवण्यात येत आहे. त्यातून वस्तुस्थिती बाहेर येईल,’ अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
विरोधकांचा न्यायालयावर खूपच विश्वास वाढलाय
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पुरोगामी आहे असे सांगताना आपणही गृह मंत्री म्हणून काम केले असल्याची भावना मांडली. मात्र राज्यातील पोलीस दलाचा त्यांना विश्वास वाटत नाही आणि सीबीआयकडे प्रकरण सोपविण्याची मागणी त्यांनी केली याचे दुःख वाटत असल्याची खंत गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. पेन ड्राइव्ह प्रकरण सीबीआयला द्या, नाहीतर न्यायालयात जाऊ असे म्हणतात. न्यायालयावर तुमचा इतका विश्वास वाढला आहे…एखादी तरी संस्था आपण सगळे मिळून सुरक्षित ठेवूया असा खोचक टोला गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लगावला.
125 तासांचं फुटेज आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील. मात्र हे प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. की या सगळ्या घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे यामध्ये कोण दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे त्यानंतरच ठरवले जाईल असे दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना स्पष्ट केले.
फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना 33 हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक 6.5 जीबीचा पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी एक पेनड्राईव्ह दिला. आज परत पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?, असा सवाल करताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.
नवाब मलिक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर कारवाई
नवाब मलिक यांची केस सीबीआयला देऊन नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. 1993 चा बॉम्बस्फोट होऊन आज बरीच वर्षे झाली आहेत. त्यातील अनेक आरोपींवर कारवाईही झाली. त्यानंतर 2005 ते 2008 मध्ये मुंबईमध्ये हल्ले झाले. नवाब मलिक हे पाच वेळा आमदार झाले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ते आवाज उठवत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केली गेली असे सांगतानाच मागच्या काळात पाच वर्षे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्याकाळातच तुम्ही नवाब मलिक यांच्यावरील कारवाई पूर्ण केली असती तर बरे झाले असते, असा टोलाही दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणांचा वापर
अनिल देशमुख यांच्याबाबतीत देखील असेच घडले आहे. घटना काय होती? तर अँटेलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांडय़ा ठेवल्या. त्या प्रकरणात मनसूख हिरेनचा खून झाला. केस एनआयएकडे गेली.अंबानींच्या घराच्याखाली जिलेटिनच्या कांडय़ा का ठेवल्या? याचे नेमके कारण एनआयएने अद्याप सांगितलेले नाही. या प्रकरणातील एक आरोपी पोलिस अधिकारी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप करतो आणि त्यातील सत्यता न पडताळता ईडीची रेड पडते. ईडीने आजवर देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर 90 छापे घातले आहेत. तपास कसा करावा हा भाग त्यांचा असला तरी एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणेचा कशाप्रकारे वापर केला जातो, हेच यातून स्पष्ट होत असल्याचा घणाघात गृहमंत्र्यांनी विरोधकांवर केला.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी कोण आहे?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱयांच्याबाबत विषय मांडला. एसटी कर्मचाऱयांचा संप झाला. त्यांचा नेता कोण? तर अॅड. गुणरत्न सदावर्ते. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारे जयश्री पाटील यांचे ते पती आहेत. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, तेच एसटी आंदोलनात एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देतात. गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी कोण आहे का? त्यांना कोण मदत करतेय, असा परखड सवाल दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना केला.
सत्ता येते जाते, एवढी अस्वस्थता चांगली नव्हे!
चार राज्यांत तुम्हाला सत्ता मिळाली. पण उत्तर प्रदेशात तुमच्या 57 जागा कमी झाल्या आहेत. पण सगळे जग जिंकल्यासारखा आपला अविर्भाव आहे. जल्लोष करा, पण केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही करू नका. सत्ता येते जाते, पण एवढी अस्वस्थता चांगली नव्हे, असे विरोधकांना गृहमंत्र्यांनी सुनावले.
राज्यात सलोख्याचे वातावरण होते ते आता बिघडले आहे.केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे, एक प्रवक्ता आधी कारवाईची घोषणा करतो आणि मग पेंद्रीय यंत्रणेमार्फत कारवाई होते, म्हणजे अशी काही हॉट लाईन बसवली आहे का?
तिसरा पेन ड्राइव्ह फडणवीसांवर बुमरँग
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुद्सीर लांबे आणि सध्या अटकेत असलेला महम्मद अरशद खान यांच्यातील संभाषणाचा पेन ड्राइव्ह आज सभागृहात सादर केला. वक्फ मंडळावर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीची सदस्य म्हणून वर्णी लावल्याचा आरोप केला. पण डॉ. लांबे यांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली नाही. ते निवडणुकीद्वारे निवडून आलेले सदस्य असल्याचे स्पष्टीकरण देत गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. दरम्यान डॉ. लांबे यांची फडणवीस सरकारच्या काळातच वक्फ बोर्डावर नियुक्ती झाल्याची माहिती पुढे आली असून फडणवीसांचा तिसरा पेन ड्राइव्ह त्यांच्यावरच बुमरॅग झाल्याचे दिसत आहे.
काय आहे यात?
डॉ. लांबेः मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहा तक पहुंचती है.
अर्शद खानः तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.
डॉ. लांबेः मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.
अर्शद खानः अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.
विरोधकांचा सभात्याग!
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रत्युत्तरासाठी उभे राहिले. पेन ड्राइव्हमधून पुरावे दिल्यानंतरही राज्य सरकारची चौकशी करण्याची इच्छा नाही. पोलीस यंत्रणा ही राज्य सरकारचीच असल्याने पोलीस याचा तपास करूच शकत नाहीत. त्यामुळे ही चौकशी सीबीआयकडेच सोपवाययला हवी, ही आमची मागणी आहे, असे सांगतानाच फडणवीस यांनी विरोधी पक्षातील सदस्यांसह सभात्याग केला.

































































