
मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटाचे काम निकृष्ट झाल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. कसारा घाटातील तडे हे भूगर्भातील हालचालींमुळे झाल्याची भीतीही राज्य सरकारने व्यक्त केली आहे.
कसारा घाटात कोटय़वधी रुपये खर्च करून केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार संजय पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारने सविस्तर माहिती दिली. जुन्या कसारा घाटात जुलै 2022 मध्ये रस्त्याच्या कडेला सुमारे 100 मीटर लांबीचे तडे आढळले. पण उर्वरित दोन पदरी रस्ता व्यवस्थित आहे. घाटातील रस्त्यावरील नैसर्गिक तडय़ांची कारणे जाणून घेण्यासाठी आयआयटी मुंबई येथील भूगर्भ विषयातील प्राध्यापक आणि इतर तज्ञांची नियुक्ती केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी-सिन्नर जंक्शनला केंद्रीय रस्ता मंत्रालयाने ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.

































































