आरोग्यसेवा कोलमडली, निवासी डॉक्टरांच्या संपाला 3 दिवस उलटूनही तोडगा नाही

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाने आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. संपाला तीन दिवस होऊनही राज्य शासनाने अद्याप तोडगा काढला नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा तीन दिवसांपासून ठप्प आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 88 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. विद्यावेतनात दहा हजार रुपयांनी वाढ द्यावी, निवासासाठी चांगल्या दर्जाचे वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवेत असताना सुरक्षा प्रदान करावी. यासह अन्य मागण्यांना घेऊन मार्ड संघटनेच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांनी 22 फेब्रुवारीपासून राज्यस्तरावर संप पुकारला आहे. पण, राज्य सरकारने या संपाची दखल घेतली नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला. या संपाचा रुग्णांना मोठा फटका बसला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 60 निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. 28 डॉक्टर इमर्जन्सी सेवा बघत आहे. निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा न निघाल्यास रुग्णांशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. संपामुळे शस्त्रक्रियांना फटका बसू शकतो.