जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचार्‍यांचा एल्गार, राज्यव्यापी मोर्च्याला जालन्यात मोठा प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकच मिशन जुनी पेन्शन, असे म्हणत आज सरकारी कर्मचार्‍यांनी एल्गार पुकारत राज्यभरात संप पुकारला. जालन्यात देखील या संपाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कर्मचार्‍यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.

या संपादरम्यान कर्मचार्‍यांनी पेन्शनच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. जालन्यातील गांधी चमन येथून मोर्च्याला सुरुवात झाली. शनी मंदिर, नूतन वसाहत मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले. या दरम्यान कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेन्शन देण्याची मागणी लावून धरत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या मोर्चात सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. हातात झेंडे आणि बॅनर घेऊन कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे अनेकांची धावपळ उडाली.

जुन्या पेन्शन योजनेनुसार शासकीय नोकरी केल्यानंतर कर्मचार्‍याला 50 टक्के पेन्शन मिळते तसेच कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला शाश्वती मिळते, परंतु 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केलेल्या नवीन पेन्शननुसार, कर्मचार्‍याच्या पगारातून 10 टक्के कपात केली जाते तसेच शासनाकडून 14 टक्के, असा निधी जमा करून शेअर्स मार्केटमध्ये गुंतविला जातो परंतु सध्या शेअर्स मार्केटमध्ये प्रचंड निच्चांक येत असल्याने निवृत्त कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना अतिशय कमी पेन्शन मिळत आहे. ज्यामध्ये त्यांच्या उदरनिर्वाह होणेसुद्धा कठीण होत चालले आहे. म्हणून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. पेंशनची मागणी पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.