
जायकवाडीतून रविवारी तीन लाख क्युसेसचा अजस्त्र जलौघ नदीपात्रात झेपावताच गोदाकाठावरील दोनशे गावांची झोप उडाली. भोंग्यांचे आवाज आणि दवंडय़ांच्या दहशतीने गावेच्या गावे रात्रभर जागीच होती. रविवार दुपारपासूनच गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये लोकांची सुरक्षितस्थळी जाण्यासाठी धावपळ सुरू होती. घराघरातून महिला, लहान मुले तसेच वृद्धांना हलवण्यात आले असून, गावांत आता फक्त कर्ते पुरुषच उरले आहेत.
गेल्या 48 तासांपासून मराठवाडय़ात पावसाने विश्रांती घेतली असली तरी नदी, नाल्यांचा पूर अद्याप ओसरलेला नाही. अनेक गावांना पुराचा पडलेला वेढा कायम आहे. आज दिवसभर उन सावलीचा खेळ चालू होता. दलदल माजल्यामुळे शेतात जाण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यातच नाशिक, अहिल्यानगरमध्ये पावसाने संततधार लावल्याने मराठवाडय़ातील संपूर्ण गोदाकाठ हादरून गेला. गेल्या आठ दिवसांपासून गोदापात्रात साधारण दीड लाख क्युसेसचा विसर्ग सातत्याने चालू आहे. त्यामुळे पैठणपासून पुढे नांदेडपर्यंत गोदापात्र फुगलेले आहे. वरच्या धरणातून येणारे पाण्याचे महाकाय लोंढे जायकवाडीत येऊन दाखल होत असतानाच धरण प्रशासनाने तीन लाख क्युसेस विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.
नांदेड शहरातील वस्त्यांमध्ये पाणी
जायकवाडीतून सोडण्यात आलेले पाणी नांदेडपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण दहा तास लागतात. परंतु, गोदावरीच्या उपनद्या, नाले, ओढे अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी गोदावरीत येत असून, त्यामुळे अजून पूरस्थिती कायम आहे. त्यात आता जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या पाण्याची भर पडल्यामुळे नांदेड शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
राक्षसभुवन पाण्यात, गंगाखेडमध्ये पुलाला पाणी लागले
जायकवाडीतून सोडण्यात आलेला पाण्याचा महाकाय लोंढा मध्यरात्री राक्षसभुवन तीर्थक्षेत्री पोहोचला. पांचाळेश्वरात पाणी घुसले. राक्षसभुवनमध्ये गोदाकाठी असलेली मंदिरे पाण्याखाली गेली. येथील प्रसिद्ध शनिमंदिराला पुराचा वेढा पडला आहे. शहागडच्या पुलाला गोदेचा स्पर्श झाल्याने पुलावरील वाहतूक थांबवली.
19 वर्षांनंतर गोदावरीला महापूर
बीड जिल्हय़ातून शहागडमार्गे गोदावरी जालना जिल्हय़ात दाखल होते. पुढे अंबड, घनसांवगी, परतूर असा तिचा प्रवास आहे. महाप्रचंड विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे जिल्हय़ातील जवळपास दहा हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
गंगाखेडमध्ये गोदाकाठी हाहाकार
जायकवाडीतून निघालेला पाण्याचा अजस्त्र्ा जलौघ बीड जिल्हा ओलांडून सोमवारी पहाटेच परभणी जिल्हय़ात दाखल झाला. गंगाखेडात गोदाकाठी त्यामुळे हाहाकार उडाला. गोदाकाठी असलेल्या वस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या. स्मशानभूमी जलमय झाली. जायकवाडीतून प्रचंड विसर्ग करण्यात येणार असल्याची सूचना करण्यात आल्यामुळे लोकांनी रात्रीतून सुरक्षितस्थळी आसरा घेतला.
गावांमध्ये आता फक्त कर्ते पुरुषच उरले
जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेसचा विसर्ग करण्यात येणार असल्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी तसेच नांदेड जिल्हा प्रशासनाला अगोदर सतर्क करण्यात आले. त्यानंतर या पाचही जिल्ह्यातील गोदाकाठावरच्या जवळपास दोनशे गावांमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यात आले. दवंड्या देण्यात आल्या. अगदीच सखल भागात असलेल्या लोकांचे शाळा, ग्रामपंचायतमध्ये स्थलांतर करण्यात आले. बहुतेक गावांतून लहान मुले, महिला तसेच वृद्धांना अगोदर सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. गोदाकाठच्या गावांमध्ये आता फक्त कर्ते पुरुषच उरले आहेत.