IPL 2020 …म्हणून केदारला जाडेजाच्या आधी फलंदाजीला पाठवले, स्टीफन फ्लेमिंगकडून स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी झालेल्या आयपीएल लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत केले. या लढतीत धावांचा पाठलाग करताना केदार जाधवला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावर चेन्नई सुपरकिंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, केदार जाधव फिरकी गोलंदाजीसमोर चांगली फलंदाजी करतो. म्हणून रवींद्र जाडेजा व ड्वेन ब्राव्हो यांच्याआधी त्याला फलंदाजीला पाठवण्यात आले. तसेच रवींद्र जाडेजा फिनिशिंग चांगली करू शकतो. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. आम्हाला आत्ममंथन करावे लागणार आहे.

जादा फलंदाजाची गरज नाही
चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करण्यात अपयश येत आहे. सुरेश रैना या अनुभवी फलंदाजाची कमी संघाला जाणवते का, असा सवाल स्टीफन फ्लेमिंग यांना केला असता ते म्हणाले, आमचा संघ संतुलित आहे. जादा फलंदाजाची गरज आम्हाला वाटत नाही. तसेच संथ खेळपट्टीवर रवींद्र जाडेजाला गोलंदाजी न देण्याचा निर्णय महागात पडला का, असा सवाल केला असता स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर महेंद्रसिंग धोनी देऊ शकतो. पण हवेच्या दिशेकडे बघून वेगवान गोलंदाजांना गोलंदाजीस सांगितले असेल.

स्वप्न साकार झाले – राहुल त्रिपाठी
चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील लढतीत अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देणाऱया राहुल त्रिपाठी याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी तो म्हणाला, याआधी मला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्यात आले. या लढतीत मला वर फलंदाजीला पाठवण्यात आले. पण मी दोन्हीसाठी सज्ज होतो. संधीचा फायदा घेता आला पाहिजे. माझ्यासाठी हे स्वप्न साकार झाल्याप्रमाणेच आहे, असे भावुक उद्गार पुढे त्याने काढले.