
बिबटय़ांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बिबटय़ांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून खरी गरज आहे ती निसर्ग पुनरुज्जीवनाची, असे स्पष्ट मत सैंक्चुरी आशियाचे संस्थापक संपादक व पर्यावरणतज्ञ बिट्टू सहगल यांनी व्यक्त केले.
सैंक्चुरी वाइल्डलाइफ अवॉर्ड्स या कार्यक्रमात वन्यजीव संवर्धन आणि छायाचित्रण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी बिट्टू सहगल म्हणाले, बिबटय़ांची नसबंदी करण्याची कल्पना अमलात आणली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. बिबटय़ाला पकडून बेशुद्ध करून प्राणिसंग्रहालयात ठेवणे हेदेखील निरुपयोगी ठरेल. हा उपाय निसर्गचक्राशी छेडछाड करणारा असून त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
ही समस्या मानवनिर्मित
सहगल म्हणाले, बिबटय़ांची समस्या नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात उभारण्यात आलेल्या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे जंगल नष्ट झाले आणि वन्यजीवांचे मार्ग तुटले. या प्रकल्पातून मिळणारे पाणी ऊस शेतीसाठी वळवण्यात आले आणि या ऊस शेतीत बिबटय़ांना आश्रय मिळाल्याने त्यांची संख्या झपाटय़ाने वाढली.




























































