ICC Ranking – स्मिथ-कोहलीमधील अंतर झाले आणखी ‘विराट’

2427

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातीत प्रतिष्ठीत अॅशेस कसोटी मालिका 2-2 बरोबरीत संपली. अॅशेस कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांनी कसोटीतील पहिले स्थान कायम राखले आहे. परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यामधील गुणांचे अंतर वाढले आहे.

ताज्या क्रमवारीमध्ये स्मिथ आणि दुसऱ्या स्थानावरील विराटमधील गुणांचे अंतर 34 झाले आहे. स्मिथकडे सध्या 971 गुण आहेत, तर विराटकडे 937 गुण आहेत. अॅशेस कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी स्मिथ 857 गुणांसह चौथ्या स्थानावर होता. या कसोटी मालिकेमध्ये स्मिथने धावांचा पाऊस पाडला आणि अखेरची कसोटी सुरू होण्यापूर्वी तो पहिल्या स्थानावर पोहोचला.

अॅशेसमध्ये धावांचा पाऊस
वर्षभराच्या बंदीच्या कारवाईनंतर संघात पुनरागमन केलेल्या स्मिथने या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. भुकेल्या वाघासारखा तो इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडला. स्मिथने या मालिकेत 110.57 च्या सरासरीने 3 शतक, 1 द्विशतक आणि 3 अर्धशतकांच्या बळावर 774 धावा चोपल्या.

गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी
स्मिथने सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गावसकर यांनी 1991 ला वेस्ट इंडीजविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 4 कसोटीत खेळताना 774 धावा चोपल्या होत्या. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर व्हीव्हीयन रिचर्डस यांचे नाव आहे. त्यांनी 1976 ला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 829 धावा चोपल्या होत्या. हा विक्रम अद्यापही अबाधित आहे.

वॉर्नरचा फ्लॉप शो
स्मिथप्रमाणे डेव्हिड वॉर्नरही बंदीच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच पांढऱ्या कपड्यात मैदानात उतरला होता. कांगारुंच्या पिवळ्या कपड्यात धमाल उडवून दिल्यानंतर वॉर्नरकडून अॅशेसमध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु पाचही कसोटी सामन्यात तो फ्लॉप गेला. संपूर्ण मालिकेत त्याने फक्त 95 धावा केल्या आहेत. अॅशेस सुरू होण्यापूर्वी तो आयसीसीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता आणि अॅशेस संपल्यानंतर तो 24 व्या स्थानावर गडगडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या