हिंदुस्थानी शेअर बाजारात एक आठवडाभरापासून जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालाचा म्हणजेच 4 जूनचा दिवस वगळता बाजारात तेजीचा उत्साह पाहायला मिळत आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रात आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा ‘एनडीए’ सरकार सत्तेवर आले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्याचा उत्साह बाजारामध्ये सोमवारी, शेअर मार्केटच्या ओपनिंगमध्ये दिसला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारपार पोहोचला, तर निफ्टीनेही 23,400 पर्यंत मजल मारली, परंतु दुपारनंतर सेन्सेक्समध्ये 270 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 76,490 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 31 अंकांनी घसरून 23,259 अंकांवर बंद झाले.
\बीएसई निर्देशांकातील पॉवर ग्रीड स्टॉक 3.33 टक्क्यांनी तर ऑक्सिस बँकेचे शेअर्स 1.63 टक्क्यांनी वधारले. अल्ट्राटेक सिमेंट 1.50 टक्के आणि नेस्ले 0.66 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. एसबीआय बँकेचा स्टॉकही 0.63 टक्के उसळला आहे. बजाज ऑटो, कोल इंडिया, श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, टेक महिंद्रा स्टॉक 2.23 टक्के, इन्फोसिस 1.70 टक्के, विप्रो 1.65 टक्के, एचसीएल टेक 1.35 टक्के, टायटन 1.11 टक्के, टीसीएस एक टक्का, एलटीआय आणि हिंडाल्कोचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. गौतम अदानी यांच्या कंपनीच्या अदानी इंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
शेअर बाजारात चढ-उतार
शेअर बाजारात आज दिवसभरात चढ-उतार पाहायला मिळाले. केंद्रात सरकार स्थापन झाले असले तरी आज दिवसभरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. हे सरकार स्थिर सरकार नसल्यामुळेही शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. पेन्शन फंड, आर्थिक संस्था, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांवर बाजाराची स्थिती अवलंबून असते.
– शेअर बाजारातील वाढ गेल्या शुक्रवारीही कायम राहिली आणि सोमवारी सकाळी बाजार उघडताच 77,017 अंकांवर उघडल्यानंतर सेन्सेक्सने आणखी तेजी पकडली, जो बीएसई निर्देशांकाचा नवीन सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारात व्यवहार सुरू होताच सुमारे 2,196 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हावर उघडले, तर 452 शेअर्समध्ये घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व दिसत असून 148 समभागांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.