Stock Market Update – ट्रम्प यांचे एक ट्विट अन् शेअर बाजार बनला रॉकेट; सेन्सेक्स 4,205, तर निफ्टी 1,252 अंकांनी वधारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिकेत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे शेअर बाजार रॉकेट बनले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने मोठी झेप घेतली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानी वस्तूंवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्याचे मान्य केल्याने गुंतवणूकदारांमध्ये उतासाहाचे वातावरण आहे.

मंगळवारी बाजारात उघडताच 30 शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स तब्बल 3,656.74 अकांनी उसळून 85,323.20 वर पोहोचला. तर 50 शेअर्सचा एनएसई निफ्टी 1,219.65 अकांच्या वाढीसह 26,308.05 वर पोहोचला. बाजार उघडल्यानंतर ही तेजी आणखी वाढली आणि सेन्सेक्स चक्क 4,205.27 अंकांनी वाढून 85,871.73 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 1,252.8 अकांच्या वाढीसह 26,341.20 वर व्यवहार करत होता. मात्र दुपारपर्यंत यात थोडी घसरण पाहायला मिळाली.

दरम्यान, मंगळवारी रोजी एकूण 111 कंपन्या त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस लि. (Adani Enterprises Ltd), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. (Adani Ports and SEZ), बजाज फायनान्स लि. (Bajaj Finance Ltd), भारत कोकिंग कोल लि. (Bharat Coking Coal Ltd), वरुण बेव्हरेजेस लि. (Varun Beverages Ltd), एनएमडीसी लि. (NMDC Ltd) या प्रमुख कंपन्यांचा समावेश असून निकालानंतर या शेअर्समध्ये हालचाल दिसू शकते.

सीझफायरप्रमाणे ‘ट्रेड डील’ची घोषणाही ट्रम्प यांनी केली; कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याबाबत काय सौदा झाला? संसदेत खुलासा करा, काँग्रेसची मागणी

टॅरिफ 7 टक्क्यांनी घटवले

अमेरिकेने हिंदुस्थानवर लावलेले 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ 7 टक्क्यांनी घटवून 18 टक्के करण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यामुळे हिंदुस्थानवर आता एकूण 43 टक्के टॅरिफ लागणार आहे. त्याचवेळी अमेरिकेवर शून्य टक्के टॅरिफ असेल आणि यासाठी पंतप्रधान मोदी तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी फोनवरील चर्चेनंतर केला. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करून अमेरिका, व्हेनेझुएलाकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यास मोदींची सहमती असल्याचे ट्रम्प म्हणाले.