कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात औषधांचा तुटवडा, उपकरणेही बिघडली; गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल

हजारो गोरगरीब रुग्णांना स्वस्त दरात उपचार देणाऱ्या कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयातील औषधांचा साठा संपला असून रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. एक्स-रेसह रक्तचाचणी आणि इतर चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर विसंबून राहावे लागत आहे. याबद्दल रुग्णांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आर्थिकदृष्टय़ा कमपुवत असलेले लोक भाभा रुग्णालयात उपचारासाठी येतात, मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासुन औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना स्वखर्चाने बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. भाभा रुग्णालय हे 336 खाटांचे रुग्णालय असूनही या रुग्णालयाला रुग्णांना विविध सेवा पुरवताना संघर्ष करावा लागत आहे. रोज सुमारे 1 हजार 700 ते 2 हजार रुग्ण रुग्णालयाच्या ओपीडीत येतात. इतक्या मोठय़ा संख्येने येणाऱ्या रुग्णांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

औषध खरेदीसाठी अर्धाच निधी

भाभा रुग्णालयाला औषध खरेदीसाठी दिला जाणारा निधी अर्ध्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे अनेक औषधे खरेदी करता येत नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्यामुळे केस पेपर्स आणि फार्मसी सेवांसाठी रांगा लागत आहेत. डॉक्टर उपलब्ध असले तरी औषधे व विविध सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक अशरफ आझमी यांनी सांगितले.

रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. नियमित औषध खरेदी होत आहे. औषध खरेदीसाठीचा निधी अर्ध्यावर आला आहे, असेही काही नाही. – डॉ. पद्मश्री अहिरे अधिष्ठाता, भाभा रुग्णालय