
पश्चिम उपनगरातून चोरलेल्या रिक्षा वसई, नालासोपारा येथे नेऊन त्या भाडय़ाने देणाऱया चोरटय़ा रिक्षा चालकाला समतानगर पोलिसांनी अटक केली. अर्शद शेख उर्फ कल्लू असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 5 रिक्षा जप्त केल्या आहे. कल्लूच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी कांदिवली पूर्व परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली होती. रिक्षा चोरी प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण राणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी अर्शदला ताब्यात घेतले. अर्शद हा रिक्षा चालक असून तो पार्क केलेल्या रिक्षा चोरतो. चोरलेल्या रिक्षा काही दिवस तो निर्जन ठिकाणी ठेवतो. त्यानंतर तो त्या रिक्षा नालासोपारा आणि वसई येथे नेतो. तेथे त्या रिक्षा भाडय़ाने देतो, अशी त्याची गुह्याची पद्धत आहे.



























































