बापरे! पोटदुखीने हैराण तरुणाची शस्त्रक्रिया, निघाले 36 खिळे, स्क्रू ड्रायव्हर आणि सळई…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका पोटदुखीने हैराण झालेल्या तरुणाच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून लोखंडाच्या 36 वस्तू निघाल्याची घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, येथील भतावा गावचा रहिवासी असलेल्या करण नावाच्या तरुणाला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. करणने अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. मात्र, त्याची पोटदुखी काही कमी होत नव्हती. अखेर त्याच्या सीटी स्कॅन आणि एक्सरेमधून त्याच्या पोटदुखीचं कारण उघड झालं. त्याच्या पोटात लोखंडी वस्तू दिसत होत्या.

चार शल्यविशारदांनी करनवर तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याच्या पोटातून ज्या वस्तू निघाल्या त्याने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं. त्याच्या पोटातून लोखंडाचे खिळे, स्क्रू ड्रायव्हर, चार इंचाची सळई अशा 36 वस्तू बाहेर काढण्यात आल्या. त्यांचं वजन 300 ग्रॅम इतकं भरलं.

शस्त्रक्रियेनंतर या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या वस्तू त्याच्या पोटात गेल्या कशा याचं कोड वैद्यकीय तज्ज्ञांना पडलं आहे. एखादं नाणं किंवा सुई पोटात जाणं शक्य आहे. मात्र, स्क्रू ड्रायव्हर, सळई अशा वस्तू त्याच्या पोटात गेल्या कशा, याचा शोध आता घेण्यात येणार आहे.