
रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी बँकेचे ठेवीदार येत्या १७ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. बँकेच्या इमारतीची किंमत चार कोटी रुपये असताना ही मालमत्ता बिल्डरच्या घशात फक्त एक कोटी रुपयांना घालण्यात आली आहे.
रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या मालमत्ता विक्रीत झालेला घपला उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने हा लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर रायगड जिल्हा उपनिबंधकांनी या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली नाही. उलट बिल्डरचे नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवरच चढवले. यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिंबधक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
आंदोलनाला प्रेस क्लबचा पाठिंबा
रोहा अष्टमी बँकेच्या आंदोलनाला रोहा प्रेस क्लबने पाठिंबा दिला आहे. क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव, रवींद्र कान्हेकर, महेंद्र मोरे, प्रशांत देशमुख यांनी बँक इमारत बचाव समितीचे प्रमुख नितीन परब, संदीप सरफळे, शैलेश रावकर, राजेश काफरे, प्रकाश कोळी यांनी आज ठेवीदारांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.


























































