
सामना प्रतिनिधी । खालापूर
गेल्या महिनाभरात तोंड न दाखवणाऱ्या पावसाने परतीच्या प्रवासात मात्र जबरदस्त तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसाने ठिकठिकाणचे विद्युत पोल कोसळले असून त्यामुळे अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे. वीजवाहिन्या दुरुस्त होण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत खालापूरवासीयांना ब्लॅकआऊटचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात खालापूरच्या गावांमध्ये अंधार पसरणार आहे.
खालापूर खोपोलीत परतीच्या पाऊस वादळवारा व विजांच्या कडकडाटासह बरसला. अवघा अर्धा तास सुरू असणाऱ्या वादळीपावसाने घोडवली खालापूर हाळ व नावंढे गावात हाहाकार उडवला. जोरदार वादळाने मुंबई-पुणे महामार्गावर पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडली. खोपोलीत झाड वीजवाहक तारेवर पडल्याने खोपोलीत जवळपास सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर घोडवली येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या 28 विजेचे खांब जमीनदोस्त झाले. नावंढे गावातही विजेचे पोल पडले, तर ट्रान्सफॉर्मर पूर्णच उखडून पडल्याने घोडवली व नावंढे गावात किमान पाच ते सहा दिवस तरी विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल, असे सांगण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने खालापूरवासीयांचे बहुतेक व्यवहार ठप्प झाले आहेत.
झाडे कोसळली, पत्रे उडाले
पावसाच्या तडाख्यात अनेक झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. खालापूरजवळ विणेगाव व कलोते गावाजवळ महामार्गावर तर हाळ गावाजवळ झाडे उन्मळून पडली. खालापूर, घोडवली, नावंढे येथे काही घरांची कौले, पत्रे वादळात उडून गेली. तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्त घरांचे पंचमाने करण्यास सुरुवात केली असून नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असेल, असे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांनी सांगितले.


































































