
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध सोमवारपासून सुरू होत आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध म्हणून त्यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासर्शक ठरावावर पहिल्याच दिवशी चर्चा व मतदान होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या उत्तरार्धाची सुरुवातच वादळी ठरणार आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वार्ध चीनची हिंदुस्थानी हद्दीतील घुसखोरी, नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टीन फाइल्समुळे गाजला. विरोधकांनी हे मुद्दे लावून धरले होते. सत्ताधाऱयांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य सदस्यांना बोलूच न दिल्याने अनेक वेळा कामकाज तहकूब झाले. लोकसभा अध्यक्ष सत्ताधाऱयांना झुकते माप देत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर उद्या वादळी चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारीही सावध झाले आहेत.
भाजप खासदारांसाठी व्हीप
लोकसभा सभापतींविरोधातील अविश्वास ठरावावरील मतदानाच्या पार्श्वभूमीवर 9 व 10 मार्च रोजी सर्व भाजप खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावे, असा व्हीप भाजपने काढला आहे. मतदानावेळी संख्याबळाचे गणित बिघडू नये म्हणून भाजपने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे विराधकांनीही मोर्चेबांधणी केली आहे.
हे मुद्दे गाजणार
- इराण युद्धाबाबत पंतप्रधान मोदींची बोटचेपी भूमिका
- ट्रम्प यांच्या मर्जीनुसार बदलले जाणारे परराष्ट्र धोरण
- केजरीवालांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर
- ईडी-सीबीआयच्या गैरवापराचा मुद्दा
- एपस्टीन फाइल्समधील नवी माहिती
- चिनी घुसखोरी
- महागाई, बेरोजगारी आणि यूजीसी वाद
























































