ओला-उबेर चालकांचा संप सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

ओला-उबेर खासगी टॅक्सीचालकांचा आंदोलनाचा शुक्रवारचा पाचवा दिवस असूनही संप न मिटल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना मात्र संधी मिळाल्याने त्यांचा धंदा चांगला झाला.

ओला-उबेर खासगी टॅक्सी व्यवसायातील सुमारे 30 हजार टॅक्सीचालकांनी आंदोलनात भाग घेतला आहे. भाडे दरात वाढीसह अन्य मागण्यांसाठी खासगी टॅक्सीचालक एकवटले आहेत. महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय कामगार संघ, मराठी कामगार सेना आदींनी हे आंदोलन पुकारले आहे. या टॅक्सीचालकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या चालकांना न्याय देऊ, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी धनंजय मुंडे आणि सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.