कारागीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

मिरज. महाराष्ट्रातील छोटेसे शहर. तंतुवाद्य निर्मिती हीदेखील कलेची साधना. मजीद सतारमेकर. त्यांच्या हातातील कलेला फ्रान्सहून मागणी आली आहे.

तानपुरा, सतार, सारंगी, तंबोरा, वीणा…असे तंतुवाद्याचे अनेक प्रकार… प्रत्येकाची प्राचीन परंपराही… काळानुसार त्याच्या निर्मितीमध्ये अनेक बदल होत आहेत. ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना पॅरिस येथे झालेल्या संगीत महोत्सवात नुकतेच आमंत्रित करण्यात आले. यापूर्वी त्यांनी जपान येथे तंतुवाद्यनिर्मितीविषयी कार्यशाळाही घेतली आहे. याविषयी ते सांगतात, पॅरिस येथे झालेल्या संगीत महोत्सवाचा अनुभव फारच छान होता. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध रुद्रवीणा वादक उस्ताद मोहिद्दिन डागर यांना तानपुऱ्यावर साथ करण्याची संधी मिळाली. त्यांचे आणि आमचे तीन पिढय़ांपासूनचे संबंध आहेत. त्यांच्याबरोबर गाण्याचा आम्हाला योग आला. धृ=पद शैलीतील गायकीत त्यांचे आणि त्यांच्या पूर्वजांचं मोठं योगदान आहे. जगभरात त्यांचे बरेच शिष्य आहेत. तसेच जपानमध्ये  तंतुवाद्यनिर्मिती कशी होते आणि वाद्याची निगा कशी राखली जाते याविषयी कार्यशाळा आयोजित केली होती. तेव्हा असं लक्षात आलं की, जपानसारख्या देशात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला खूप महत्त्व आहे. तिथले लोक शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी खास हिंदुस्थानात एक ते दोन वर्षाचा व्हिसा घेऊन येतात. इथे राहून हिंदुस्थानी संगीत शिकतात आणि त्यांच्या देशात त्याचा प्रचार करतात.

त्यांच्या तंतुवाद्य केंद्रात सतार, सारंगी, दिलरुबा, तंबोरा, वीणा अशी काही हिंदुस्थानी शास्त्रीय तंतुवाद्ये हाताने तयार केली जातात. त्यामध्ये कोणत्याही मशीनचा वापर केला जात नाही. लाकडाचा सांगाडा, त्यावरचं नक्षीकाम, पॉलीश, त्याला तारा लावणे आणि नंतर ते प्रत्यक्ष वाजवणे ही सर्व कामे हातीच केली जातात. एक वाद्य तयार करायला एक महिना लागतो. वाद्याचं नक्षीकाम, उंची आणि रुंदीनुसार त्याचा आकार तयार करणे, पॉलिश आणि त्यावर रंगकाम करणे, शेवटचं काम सूर काढणे हे प्रत्येक काम वेगवेगळ्या व्यक्ति करतात. यामुळे कमी वेळात एखादं वाद्य लवकर तयार होतं. कलाकाराच्या मागणीनुसार प्रत्येक वाद्य तयार केलं जातं. कोणतंही वाद्य आधीच तयार करून ठेवलेलं नसतं. सांगली, कोल्हापूर, मिरज येथे जी वाद्य बनवली जातात त्यांना मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चैन्नई, केरळ आणि परदेशात अमेरिका, जपान, फ्रान्स, युके, पॅरिस येथील देशभरात मागणी असते, अशी माहिती ते तंतुवाद्यनिर्मितीविषयी देतात.

सतार, तंबोरा, वीणा, सारंगी, गिटार अशा अनेक वाद्यांची निर्मिती तुम्ही करता त्यापैकी तुम्हाला कोणतं वाद्य भावतं आणि का? यावर त्यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक वाद्य जे आम्ही बनवतो त्यामागे आमच्या भावनाच असतात. त्यामध्ये गुणवत्ता कायम कशी राखली जाईल याचा आम्ही खूप विचार करतो. त्यासाठी वापरण्यात येणाऱया लाकडाचेही खूप प्रकार आहेत. लाकूड जोपर्यंत पूर्ण वाळत नाही तोपर्यंत ते वाद्यासाठी वापरण्यायोग्य होत नाही. आम्ही जेव्हा कलाकाराला एखादे वाद्य देतो तेव्हा वाद्य आणि कलाकाराशी आमचं नात जुळतं. ते अखेरपर्यंत टिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. सतारमध्येही आम्ही खूप बदल केले आहेत. वेगवेगळे रंग वापरले आहेत. तानपुऱयातही नवीन बदल केले आहेत. इतर वाद्यांपैकी तानपुरा मला जास्त भावतो कारण ‘तानपुरा इज अ मदर ऑफ ऑल  इन्स्टमेंटस’. त्यामध्ये फक्त चारच तारा दिसतात, पण त्यामध्ये लोकांचं आयुष्य जातं. तानपुऱयाचं माप, आकारानुसार ताऱयांची उंची सर्वच वेगवेगळं असतं, तरीही त्यात गुणवत्ता राखून नवे बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच वाद्यांची निर्मिती करण्यात आम्हाला आनंद मिळतो.

परदेशी कलाकारांची मागणी – सतार आणि तानपुरा
तंतुवादनात हिंदुस्थानी आणि परदेशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे, असे विचारता ते सांगतात, परदेशी विद्यार्थ्यांमध्ये जेवढी लोकप्रियता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आहे, तेवढी कुठेतरी आपल्याकडे कमी झालीय असं वाटतं. त्यांची मेहनत करण्याची तयारी आणि नवीन शिकण्याची जिद्दही मोठी आहे, हे प्रत्यक्ष अनुभवलं. आपली नवीन पिढी परदेशी गायकीकडे खूप ओढली जातेय असं दिसतंय. त्यांच्यावर गिटार वादनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे गिटार विकत घेण्याकडे त्यांची मागणी वाढत आहे. सतारवादनासाठी परदेशी कलाकारांची मागणी जास्त असते, मात्र असे असले तरी गाण्यासाठी, रियाजासाठी तानपुरा लागतो. या दोन वाद्यांची मागणी परदेशी कलाकार जास्त करतात.  यामध्येही मेल तानपुरा आणि फिमेल तानपुरा असे दोन प्रकार आहेत. आवाजाच्या पोतानुसार तो तयार केला जातो. गुरुंच्या मार्गदर्शनानुसार तानपुरा बनवला जातो.

तंतुवाद्य निर्माताही कलाकारच… 
तंतुवाद्य बनवणाऱया व्यक्तीकडे कधीच कलाकार म्हणून बघितले जात नाही. वाद्य कसं तयार होतं, त्यासाठी कोणत्या अडचणी येतात, या गोष्टीकडे आपल्या देशात फारसं लक्ष दिलं जात नाही, कारण वाद्य तयार करणाऱयाला तो तयार करत असलेल्या वाद्यांपैकी एखाद तरी वाद्य वाजवता येणं आवश्यक असतं. तेव्हाच तो त्यातून निघणारी सुरावट ओळखू शकतो. असे असले तरी व्यवसायाच्या दृष्टीने पाहता आमचा प्रयत्न नाव आणि वाद्याची गुणवत्ता टिकवण्याकडे असतो. कारण त्याच बळावर आम्ही मोठय़ा कलाकारांना आकर्षित करू शकतो, अशी खंतही मजीद सतारमेकर व्यक्त करतात.

[email protected]