
आता क्रिकेटच्या प्रकारात कसोटी, वन-डेसोबत टी-20चा समावेश झालाय. त्यामुळे जगभरात टी-20 लीगचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. जगभरातील बहुतांशी क्रिकेटपटूंना धकाधकीच्या वेळापत्रकाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे कदाचीत यापुढे कोणत्याही क्रिकेटपटूला जास्त काळ देशासाठी क्रिकेट खेळता येणार नाही. हाच धागा धरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यावेळी म्हणाला, जागतिक क्रिकेटमध्ये होत असलेले बदल पाहता 500 बळी घेणारा मी जगातील अखेरचा वेगवान गोलंदाज असणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने ही कामगिरी करून दाखवली.
स्टुअर्ट ब्रॉड याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या कसोटीनंतर जे वक्तव्य केले ते योग्यच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आता त्याच्यानंतर कसोटीत 500 बळी गारद करणारा वेगवान गोलंदाज जवळच्या काळात निर्माण होईल अशी कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. हिंदुस्थानच्या इशांत शर्माने 297 व न्यूझीलंडच्या टीम साऊथीने 284 व ट्रेण्ट बोल्टने 267 कसोटी बळी टिपले आहेत. सध्या खेळत असलेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये हे तीनच गोलंदाज पुढे आहेत. तसेच हे तीन गोलंदाज 500 बळींचा टप्पा ओलांडतील ही शक्यता दिसत नाही.





























































