गर्दीचा बळी! पेपर द्यायला निघाला, पण..; बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावीच्या परीक्षेला निघालेल्या डोंबिवलीतील सोहम कठरे या विद्यार्थ्यावर आज काळाचा घाला पडला. डोंबिवलीहून लोकलने निघालेल्या सोहमचा गर्दीमुळे तोल गेला आणि तो मुंब्रा-कळव्याच्या दरम्यान थेट रुळावर कोसळला. बारावीचा पहिला पेपर देण्याआधीच सोहम लोकलमधील गर्दीचा बळी ठरला. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लोकलची गर्दी आणखी किती प्रवाशांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

सोहम कठरे हा मूळचा सातारा जिह्यातील कठरेवाडीचा असून तो शिक्षणासाठी डोंबिवलीच्या आजदेगाव येथील मामाच्या घरी राहत होता. तो कळव्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी सायन्स शाखेत शिकत होता. अभ्यासात हुशार असलेला सोहम हा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येदेखील भाग घ्यायचा. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येदेखील तो लोकप्रिय होता. बारावीचा आजचा इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर होता. त्याचे सेंटरही कळव्यातीलच मनीषा विद्यालयात आले होते.

रेटारेटीमुळे तो दरवाजातच अडकला

सकाळी 11चा पेपर असल्याने सोहम आज सकाळी लवकरच  घरातून निघाला. परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचायचे असल्याने गर्दी असूनही त्याने डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. रेटारेटीमुळे त्याला आत जाता येईना. अखेर तो लटकत दरवाजातच उभा होता. लोकल कळवा-मुंब्रा दरम्यान येताच त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आईवडिलांचा आक्रोश

बारावीचा विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे कळताच रेल्वे कर्मचारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन त्याला तातडीने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याच्या मृत्यूची घटना समजताच त्याच्या आईवडिलांनी अक्षरशŠ आक्रोश केला. आमचा सोहम गेला हो… हा त्यांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. वडील सचिन कठरे हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्याचा लहान भाऊ नववीमध्ये शिकतो.  18 वर्षांच्या तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कठरे कुटुंबाचे भावविश्वच हरपले आहे. आज संध्याकाळी त्याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर सातारा येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रवासी संघटनेची आज निदर्शने

लोकलमधून पडून अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज परीक्षेसाठी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याला नाहक आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ प्रवासी संघटना तसेच विद्यार्थी व पालकांच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात ठाण्यात काळा मास्क लावून आंदोलन करण्यात येणार आहे.