
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरातील बलुतेचा मळा भागातील विहीरीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रतीक वसंत मसने असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो योगेश्वरी माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची परीक्षा झाली आहे. प्रतीक २८ मार्चपासून बेपत्ता होता. तो हरवल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, रविवारी सकाळी परिसरातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याने आत्महत्या केली किंवा त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी करत आहेत.
























































