
सामना ऑनलाईन । वर्धा
सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘हेपेटायटीस बी’ लसीच्या रिअॅक्शनमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 10 विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या आहेत. हिमानी मलोंडे (18) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना ‘हेपेटायटीस बी’ लस देण्यात आली होती. मात्र लस दिल्यानंतर 12 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने एकच धावपळ उडाली.
रुग्णालयात वावरताना संरक्षण म्हणून ‘हेपेटायटीस बी’ ही लस नियमित दिली जाते. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी तसेच डॉक्टरांनाही हेपेटायटीस बीचे इंजेक्शन घेणे बंधनकारक असते. मात्र विद्यार्थिनींना लस दिल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडून डोकेदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हिमानी मलोंडेची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान हिमानीचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांना दिलेल्या लसीचा पुरवठा हा जिल्हा आरोग्य विभागामार्फत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या लसीच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये मृत्युची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
























































